महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा जूनमध्ये सुरू होतात तर इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा या एप्रिल महिन्यात सुरू होतात. शाळा सुरू व्हायच्या कित्येक महिने आधीपासूनच मुलाची फी कशी भरायची, मुलांना लागणारे नवीन गणवेश, स्कूल बॅग, बॉटल, पुस्तकं, वह्या यांच्यासाठी पैशांची जमवाजमव कशी करायची हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो. या गोष्टींची दिवसेंदिवस किंमत प्रचंड वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी ठरवलेले बजेट कमीच पडते. त्यामुळे मुलांच्या शाळेच्या गोष्टी घेण्यासाठी पैसे कशाप्रकारे जमवायचे याविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
यादी बनवा
मुलांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत याची सगळ्यात पहिल्यांदा लिस्ट बनवा. यासाठी तुम्ही मुलांच्या शिक्षकांशी एकदा चर्चा करा. शाळेची फी, गणवेश यासोबतच खेळाची फी, नृत्य क्लासेस फी, गायन क्लासेस फी अशा अनेक गोष्टींसाठी काही शाळांमध्ये फी भरावी लागते. त्यामुळे तुमच्या मुलांना अशा कोणत्या गोष्टींचे पैसे भरायचे आहेत याबाबत शिक्षकांना विचारा. तसेच गणवेश, बॅग्स यांसारख्या गोष्टी काही शाळा या स्वतःच देतात. यासाठी त्यांना वेगळे पैसे द्यावे लागतात. त्याबाबत देखील शाळेत चौकशी करा. तसेच या व्यतिरिक्त वह्या, पुस्तकं, कंपास, रंगपेटी यांसारख्या कोणकोणत्या गोष्टी तुमच्या मुलांना लागणार आहेत याबाबत मुलांना विचारा आणि सगळ्या गोष्टी एका कागदावर लिहून घ्या. यामुळे तुम्हाला या सगळ्यासाठी किती पैसे लागणार आहेत याची कल्पना येईल.
सेलच्या काळात शॉपिंग करा
तुमच्या मुलांना दरवर्षी पेन्सिल, पेन, कंपास, रंगपेटी, बॅग, बूट यांसारख्या अनेक वस्तू लागतात. त्यामुळे या वस्तू ज्यावेळी लागणार आहेत त्याचवेळी त्याची खरेदी करण्याची सवय बंद करा. वर्षभरात ज्या वेळात मॉल, ऑनलाईन वेबसाईट यावर सेल लागतो. त्यावेळी तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. यामुळे तुमचा चांगलाच पैसा वाचेल आणि तुमच्या मुलांना आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता.
यादी काढल्याशिवाय शॉपिंगला जाऊ नका
अनेकवेळा शॉपिंगला गेल्यानंतर अनावश्यक अशा अनेक गोष्टींची आपण नकळत खरेदी करतो. त्यामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत याची यादी काढल्याशिवाय कधीच शालेय वस्तूंची शॉपिंग करायला जाऊ नका. तसेच मुलांसोबत जाण्याआधीच चर्चा केल्याने मला हीच गोष्ट पाहिजे असा हट्ट मुलं दुकानात गेल्यानंतर करणार नाहीत.
मुलांना बजेटविषयी समजून सांगा
तुमच्या मुलांना देखील पैशांचे महत्त्व कळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्यासाठी त्यांना सोबतच घेऊन जा... बॅग, बूट यांसारख्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर वेगवेगळ्या ब्रँडच्या किमती पाहा आणि त्यातून तुम्हाला परवडेल अशीच गोष्ट घ्या. यातून मुलांना देखील आपल्या बजेटमध्ये खरेदी कशाप्रकारे करायची हे कळेल आणि माझ्या मित्राकडे या ब्रँडचे बूट आहेत, त्यामुळे मला देखील याच ब्रँडचे बूट हवेत असा हट्ट मुलं करणार नाहीत आणि तरीही मुलाने एखादी गोष्ट मागितली तर आपल्या आर्थिक बजेटबद्दल त्याला सांगा आणि मला ही गोष्ट परवडणार नाही असे त्याला ठाम सांगा.