भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल म्हणजेच ICC World Cup 2023 च्या तिकिटांची बुकिंग सर्वसामान्यांसाठी आजपासून (दि. 25 ऑगस्ट) सुरू झाली. 4 वर्षांतून एकदा होणाऱ्या या स्पर्धेच्या तिकिटांच्या बुकिंग आणि विक्रीची जबाबदारी बीसीसीआयने यावेळी BookMyShowला दिली आहे.
पुरुषांच्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 58 मॅचेस भारतातील 12 शहरांमध्ये खेळल्या जाणार आहेत. त्यातील 10 मॅचेस या वॉर्मअप फिक्सर असणार आहेत. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2023) सुरू होणार असून 19 नोव्हेंबरला तो संपणार आहे.
बीसीसीआयने BookMyShowला अधिकृत तिकिटांची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे क्रिकेटशौकिन या प्लॅटफॉर्मवरून तिकीट खरेदी करू शकतात. नियमित सामन्यांव्यतिरिक्त क्रिकेट रसिक वॉर्म-अप मॅचेसची तिकिटे ऑनलाईन खरेदी करू शकतात.
ऑनलाईन तिकिट कशी बुक करणार?
वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरोधात होणार आहे. त्यामुळे भारताच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री 29 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर सेमी आणि फायनल सामन्यांच्या तिकिटांची विक्री 14 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल. वर्ल्ड कपमधील सर्वांत पहिली मॅच गुजरात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्या दरम्यान होणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना कधी?
भारतीयांसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे ती वर्ल्ड कपच्या फायनलपेक्षा भारी असते. या सामन्यासाठी क्रिकेटशौकिन वाट पाहत असतात. यावेळी हा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्यांची तिकिट विक्री अवघ्या काही तासांत संपण्याची शक्यता आहे.