चांगले शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून अनेक पालक आपल्या पाल्यांना बालवाडीपासूनच चांगल्या नामांकित शाळेमध्ये दाखल करतात. मात्र, सध्याचे शिक्षण हे अतिशय महाग झाले आहे. बालवाडीतच विद्यार्थ्याला किमान 25 ते 30 हजार रुपये खर्च गृहीत धरावा लागत आहे. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा खर्च आणखी वाढतच जातो. यामुळे बहुतांश पालकांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चासाठी कर्ज काढण्याच्या पर्याय स्वीकारावा लागतो. अनेक पालकांची ही गरज ओळखून बँक ऑफ बडोदाने बडोदा विद्या (Baroda Vidya) ही खास शैक्षणिक कर्जाची सुविधा (Education Loan Facility) सुरू केली आहे.
बडोदा विद्या कर्ज सुविधा- Baroda Vidya Education Loan Facility
शैक्षणिक कर्ज म्हटले की विविध बँकांकडून प्राधान्याने उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र, चांगल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी देखील मोठ्या प्रमाणात खर्च येतो मात्र अनेकदा बँकांकडून अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध होत नाही. पंरतु,मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची कर्जाची गरज लक्षात घेत बँक ऑफ बडोदाने 'बडोदा विद्या' (Baroda Vidya) ही एक स्वंतत्र शैक्षणिक कर्ज (Education Loan) सुविधा सुरू केली आहे. बडोदा विद्या अंतर्गत बँकेकडून कर्जदारास नर्सरी ते पाचवी, सहावी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा तीन टप्प्यांच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या कोणत्याही शैक्षणिक वर्षासाठी कर्ज घ्यायचे झाल्यास ते सहज शक्य होणार आहे.
4 लाखांपर्यंतचे कर्ज Education Loan
'बडोदा विद्या' या कर्ज सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण महामंडळ, सीबीएसई, आसीएसई बोर्ड या बोर्डाकडून मान्यता प्राप्त शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक कर्जासाठी पात्र ठरतात. या माध्यमातून बँकेकडून जास्तीत जास्त 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी बँकेकडून 12.50 टक्के वार्षिक व्याजदर आकारला जातो. तसेच या कर्जाच्या परतफेडीचा पहिला हप्ता हा लोन मिळाल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर सुरू होतो. विशेष म्हणजे या कर्जासाठी बँकेकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
आवश्यक कागदपत्रे-
या शैक्षणिक कर्जासाठी ज्या मुलासाठी शैक्षणिक कर्ज (Education Loan) घ्यायचे आहे, त्याचे शैक्षणिक कागदपत्रे, मार्कलिस्ट, शाळेत प्रवेश घेतल्याचे पत्र, ओळखपत्र,यासह वार्षिक एकूण खर्चाची माहिती आवश्यक आहे. तसेच हे कर्ज पालकाच्या नावे दिले जात असल्याने पालकाचे केवायसीसाठी आवश्यक आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा पुरावा म्हणून बँक खात्याचे स्टेटमेंट यासह बँकेकडून सांगण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रे गरजेची असतात. या कर्जामध्ये विद्यार्थ्याच्या शाळेची फी, शैक्षणिक साहित्य, वसतिगृह, लॅपटॉप इत्यादीसाठीच्या खर्चाचा समावेश आहे.