पश्चिम बंगाल सरकारने तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आणली आहे. 'भविष्यत’ असे या योजेनेचे नाव असून, सदर योजनेअंतर्गत व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांना क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल राज्यातील सर्वच बँकांनी एकमताने यासाठी सहमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार अमित मित्रा यांनी माध्यमांना सांगितले आहे..
‘भविष्यत क्रेडीट कार्ड योजने’ची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. 15 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल सरकारचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील युवकांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही या योजनेमागची कल्पना असल्याचे सरकारने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार ‘मुद्रा योजना’ राबवत असून, त्यात कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. परंतु पश्चिम बंगाल सरकारच्या ‘भविष्यत’ योजनेत क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे. तरुण उद्योजकांना आवश्यक त्या कामासाठी कधीही या क्रेडीट कार्डचा वापर करता येणार आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?
लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना बनविण्यात आली आहे. सदर क्रेडीट कार्डवर राज्य सरकार 15 टक्के गॅरंटी मनी आणि 85 टक्के कर्ज हमी प्रदान करणार आहे. सरकारने ठरवून दिलेल्या नियम व अटी पूर्ण करणाऱ्या 18-45 वर्षे वयाच्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सर्व काही सुरळीत राहिल्यास या वर्षी 2 लाख तरुण व्यवसाय सुरू करू शकतील असे सरकारने म्हटले आहे. कंपनी सुरु करताना कंपनीकडे किमान 25,000 रुपयांचे भाग-भांडवल असणे गरजेचे आहे असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे.
कधीपासून सुरु होणार योजना?
येत्या 1 एप्रिलपासून ही योजना सुरु होणार असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुण उद्योजकांचे मूल्यमापन सुरू केले जाणार आहे. यासाठी खास पोर्टल तयार बनविण्यात आले आहे. यासंदर्भात राजपत्रात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी आधीपासूनच क्रेडीट कार्ड योजना
पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्याला जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळावे यासाठी विद्यार्थी क्रेडीट कार्ड योजना 2021 मध्ये तेथील सरकारने सुरु केली आहे.. राज्य सहकारी बँक आणि तिच्या संलग्न केंद्रीय सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकांकडून विद्यार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. या कर्जावर 4% वार्षिक व्याज आकारले जाणार आहे. अभ्यासाच्या कालावधीत कर्ज परतावा केल्यास कर्जदारास 1% व्याज सवलत देखील दिली जाते.
कर्जासाठी अर्ज करताना इच्छुक विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्षे ठेवण्यात आली आहे. या क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी परतफेडीचा कालावधी पंधरा (15) वर्षांचा आहे.