वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तीन वेळा वाढ केली. यामुळे मागील दोन महिन्यात बँकांनी कर्जाचा व्याजदर वाढवला आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांसह सर्वच प्रकारची कर्जे महागली आहेत. सणासुदीत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर या निवडक बँका आहेत ज्यांचा वाहन कर्जाचा व्याजदर (Bank's Offering Cheapest Car Loan) दर कमी आहे.
नवरात्रीपासून उत्सवकाळ सुरु होणार आहे. तो पुढे डिसेंबर अखेरपर्यंत सुरु राहील. कोरोनामुळे सलग दोन वर्ष बाजारपेठेवर मंदीचा प्रभाव होता. मागील सहा महिन्यांत टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली. सणासुदीच्या दोन महिन्यात ऑटो, रिअल इस्टेट या क्षेत्रात मोठी उलाढाल अपेक्षित आहे. अनेकांनी नवी कार घेण्याचा निर्णय पक्का केला असेल. त्यानिमित्ताने ऑटो डिलर्सकडे ऑफर्ससाठी चौकशी झाली असेल. किमान 10 लाखांचे अर्थसहाय्य आणि 7 वर्षांसाठी वाहन कर्ज देणाऱ्या बँकांचा कर्जदर जाणून घेऊया.
सध्या वाहन कर्जाचा सर्वात कमी व्याजदर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ऑफर करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँकेचा व्याजदर 7.65% असून 10 लाख रुपयांच्या कर्जाचा EMI 15,412 रुपये आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘एसबीआय’चा (SBI) कार लोनचा दर 7.9% इतका आहे. सात वर्षांच्या मुदतीसाठी 10 लाख रुपयांचे कर्जावर 15,536 रुपये इतका मासिक हप्ता असेल.
एचडीएफसी बँकेचा कार लोनचा दर 7.95% इतका आहे. या कर्जावर EMI 15,561 रुपये इतका आहे. बँक ऑफ बडोदाचा देखील 7.95% कर्जाचा दर आहे. करुर वैश्य बँक 8% दराने कर्ज देते. 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी मासिक हप्ता 15,586 रुपये इतका आहे.खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेचा कर्जाचा दर 8 % आहे. पंजाब नॅशनल बँकेचा कर्जाचा दर 8.15 % असून 10 लाख रुपयांचे 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास कर्जदाराला 15,661 रुपये EMI भरावा लागेल. बँक ऑफ महाराष्ट्रचा वाहन कर्जाचा दर 8.2% असून 7 वर्षांसाठी 10 लाखांचे कर्ज घेतल्यास त्यावर 15,686 रुपये मासिक हप्ता भरावा लागेल.
अॅक्सिस बँकेचे कार लोन 8.2% दराने उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचे कार लोनचा दर 8.25% असून 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी ईएमआय 15,711 रुपये आहे.Bankbazaar.com.या वेबसाईटवरील 30 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध माहिती आहे. या व्याजदरात बदल होऊ शकतात. तसेच त्यावर प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क आकारण्याची शक्यता आहे.