महिलांना केंद्रित करून बँकांमार्फत विविध योजना व सेवा सुरू केल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने वेगळे बचत खाते उघडण्याची देखील सुविधा दिली जाते. आता बँक ऑफ इंडियाने उत्पन्नाचा वेगळा स्त्रोत असणाऱ्या महिलांसाठी ‘नारी शक्ती’ नावाने बचत खाते योजना सुरू केली आहे.
नियमित बचत खात्याच्या तुलनेत ‘नारी शक्ती बचत खात्यांतर्गत’ खातेधारकांना अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. विम्यापासून ते कर्जावरील व्याजात सवलत अशा अनेक सुविधांचा फायदा हे खाते उघडणाऱ्या महिलांना मिळेल.
नारी शक्ती बचत खाते काय आहे?
नोकरी करणाऱ्या व स्वतः कामातून उत्पन्न मिळविणाऱ्या महिलांसाठी बँक ऑफ इंडियाने ‘नारी शक्ती बचत खाते’ नावाने योजना सुरू केली आहे. 18 वर्षांवरील कोणतीही महिला या अंतर्गत स्वतःचे बँक खाते उघडू शकते.
या खात्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे व त्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हे खाते उघडल्यास महिलांना स्वतःचे पैसे बचत करता येतील. तसेच, आर्थिक स्वातंत्र्य देखील प्राप्त होईल.
कसे उघडू शकता बचत खाते?
18 वर्षांवरील कोणतीही महिला या अंतर्गत बचत खाते उघडू शकते. बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील जवळपास 5132 शाखांमध्ये बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, बँकेच्या शाखेत जाणे शक्य नसल्यास ऑनलाइन माध्यमातून देखील बचत खाते उघडू शकता.
नारी शक्ती बचत खाते उघडणाऱ्या महिला मिळणार अनेक फायदे
मोफत क्रेडिट कार्ड | नारी शक्ती बचत खाते उघडणाऱ्या महिलांना बँकेद्वारे मोफत क्रेडिट कार्ड दिले जाईल. याचाच अर्थ महिला कोणतेही शुल्क न देता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहज मोठे आर्थिक व्यवहार करू शकतील. |
अपघात विमा | हे खाते उघडणाऱ्या महिलांना अपघात विमा संरक्षणाचा देखील फायदा मिळेल. महिलांना 1 कोटी रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण प्राप्त होईल. |
आरोग्य विमा | अपघात विम्यासह बचत खाते असलेल्या महिलांना आरोग्य विमा व इतर आरोग्याशी संबंधित उत्पादनांवर सवलत मिळेल. |
कर्जावरील व्याज दरात सवलत | किरकोळ कर्ज काढणाऱ्या महिलांना व्याजदरात देखील सवलतीचा फायदा मिळेल. यामुळे महिलांना सहज परवडणाऱ्या कर्जाची उपलब्धता होईल. |
प्रोसेसिंग फी | महिला खातेधारकांना कर्जावरील प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ असेल. यामुळे महिलांना कर्ज काढण्यास मदत मिळेल व त्यांच्यावर आर्थिक भार पडणार नाही. |
5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार | नारी शक्ती बचत खाते उघडणाऱ्या महिला खातेधारकांसाठी पॉइंट-ऑफ-सेलची (POS) मर्यादा 5 लाख रुपये आहे. म्हणजेच महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करणे शक्य आहे. |
लॉकर सुविधा | महिला खातेधारकांना स्वस्तात लॉकर सुविधा उपलब्ध होईल. लॉकर शुल्कात सूट मिळाल्याने महिला त्यांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवू शकतील. |
याशिवाय, प्लॅटिनम दर्जा मिळालेल्या महिला खातेधारकांना अनेक मोफत सुविधांचा देखील फायदा मिळणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या व स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या महिलांना या बँक खात्याचा नक्की फायदा होऊ शकतो.