Nifty IT Index Fund: बंधन म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी एका नव्या योजनेद्वारे आणली आहे. बंधन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच Nifty IT Index Fund लाँच केला आहे. 18 ऑगस्टला ही योजना लाँच केली आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकाळात मोठी संधी असल्याचे बंधन म्युच्युअल फंडने म्हटले आहे.
ओपन एंडेड फंड
ही योजनेद्वारे देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात येईल. न्यू फंड ऑफर 18 ऑगस्टला लाँच झाली असून 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. हा ओपन एंडेड फंड असल्यामुळे NFO कालावधीनंतर कधीही योजनेत गुंतवणूक करता येईल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रगती करत आहे. IT इंडेक्सची घोडदौड सुरूच आहे, असे बंधन AMC च्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख Gaurab Parija यांनी CNBC-TV18 शी बोलताना म्हटले.
पुढील पाच-ते दहा वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट होईल. तसेच अल्पकालावधीत IT क्षेत्रात चढउतार होऊ शकतात. मात्र, दीर्घकालावधीत चांगली वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. तसेच निफ्टी-50 यादीत IT क्षेत्राचा वाटा 13 टक्के आहे.
आयटी कंपन्यांमध्ये फंडाद्वारे गुंतवणूक
इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टीसीएस सारख्या बलाढ्य आयटी कंपन्या भारतात आहे. युरोप आणि अमेरिकेतील ग्राहकांना बड्या कंपन्यांकडून सेवा पुरवल्या जातात. तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानामध्येही मोठी गुंतवणूक होत आहे. त्यामुळे भविष्यात आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. IT म्युच्युअल फंडमधून गुंतवणुकदारांनाही चांगला परतावा मिळू शकतो.