आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत केंद्र सरकारने शहरातील व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबियांना विमा उपलब्ध करून दिला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) 2018 पासून सुरू आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) या योजनेद्वारे आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारतचे कार्ड बनवून घ्यावे लागते. या कार्डच्या आधारे हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.
आयुष्मान भारत योजनेचा उद्देश (Ayushman Bharat Scheme Goal)
आयुष्यमान भारत योजनेद्वारे देशातील 10 कोटीहून अधिक गरीन कुटुंबियांना आरोग्यविषयक सेवा मोफत उपलब्ध करून देणं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थी कोण?
2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व शहरी भागातील सुमारे 10.36 कोटी गरीब कुटुंबं या योजनेच्या कक्षेत येतात.
आयुष्यमान भारत योजनेचे पात्रता निकष
2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेनुसार ग्रामीण भागातील डी1, डी2, डी3, डी4, डी5 आणि डी7 प्रकारातील कुटुंबांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. तर शहरी भागातील गरीब कुटुंबाच्या कामाच्या आणि व्यवसाच्या प्रकारानुसार त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेतील लाभार्थी हे सुद्धा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ किती?
आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 30 हजार रूपयांपासून 5 लाख रूपयांपर्यंतचा वैद्यकीय विम्याचा लाभ मिळतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला जात आहे. पूर्वीची राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (RSBY) ही आयुष्यमान भारत योजनेत विलिन करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील लोकांसाठी आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता
ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या कुटुंबाकडे राहण्यासाठी पक्के घर नाही, तसेच ज्या कुटुंबात 16 ते 59 या वयोगटातील व्यक्ती नसेल, कुटूंब प्रमुख महिला असेल, कुटूंबात कोणी दिव्यांग व्यक्ती असल्यास आणि अनुसूचित जाती/जमातीतील भूमिहीन व्यक्ति व वेठबिगार मजूर या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. तसेच ग्रामीण भागातील बेघर, निराधार, भीक मागणारे आणि आदिवासी व्यक्तींना कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.
शहरी भागातील लोकांसाठी आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता
शहरातील विविध परिसरात रस्त्यावर राहणारे, बेघर, भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे आणि फेरीवाले या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर बांधकामाच्या साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे हमाल, सफाई कामगार, मोलमजुरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र आहेत.
या योजने अंतर्गत लाभ मिळणाऱ्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून उपचारांचा सर्व खर्च योजनेतून केला जातो. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी व डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा खर्चही यात कव्हर होतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या योजनेत 1354 आरोग्य सेवा समाविष्ट केल्या आहेत. यात अनेक शस्त्रक्रियांचाही समावेश करण्यात आला आहे. देशातील सर्व सरकारी आणि सरकारच्या पॅनेलमध्ये असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्येही आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थी उपचार घेऊ शकतात.
आयुष्यमान भारत योजनेसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थी त्यांची नावे mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात.