देशातील पहिल्या पाच खासगी बँकांमध्ये समावेश असलेल्या अॅक्सिस बँक समूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या अॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीच्या फंड व्यवस्थापकांनी फंडमधील धोरणात फेरफार आणि निधीत बदल केल्यामुळे संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार घसरण झाल्याचे दिसून आले.
अॅक्सिस म्युच्युअल फंड हाऊसने, वीरेश जोशी, मुख्य व्यापारी आणि निधी व्यवस्थापक यांना अॅक्सिस म्युच्युअल फंडच्या 7 इक्विटी योजनांमधून तर इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट आणि फंड मॅनेजर दीपक अग्रवाल यांना तीन फंडांच्या व्यवस्थापन टीममधून काढून टाकण्यात आले आहे, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्स या संकेतस्थळाने दिले आहे.
अॅक्सिस म्युच्युअल फंड हाऊस गेल्या दोन महिन्यांपासून (फेब्रुवारी 2022 पासून) या प्रकरणाचा तपास करत आहे. कंपनीने या तपासासाठी काही नामांकित सल्लागारांची मदत घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी दोन्ही व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले. अॅक्सिस कंझम्पशन ईटीएफ, अॅक्सिस बँकिंग ईटीएफ, अॅक्सिस निफ्टी ईटीएफ, अॅक्सिस आर्बिट्रेज फंड, अॅक्सिस क्वांट फंड, अॅक्सिस टेक्नॉलॉजी ईटीएफ आणि अॅक्सिस व्हॅल्यू फंड या म्युच्युअल फंडच्या व्यवस्थापनात बदल झाल्याचे दिसून आले होते.
2009 पासून अॅक्सिस बॅंक म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये कार्यरत असून अॅक्सिस फंड हाऊसतर्फे एकूण 2.60 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन केले जात असून व्यवस्थापनाबाबत हा फंड हाऊस सातव्या क्रमाकांवर आहे.