• 02 Oct, 2022 08:03

सोन्याच्या दागिन्यांतील फसवणूक अशी टाळा!

GOLD RATE

सोन्याच्या वस्तू खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक टाळावी यासाठी हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विक्री करणं बंधनकारक करण्यात येत आहे.

भारतात सोन्याचा ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने आहे. देशात सोन्याची मागणीही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोने आपली जीवनपद्धत आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. सणवार असोत की लग्नकार्य, सोन्याच्या दागिन्यांनी त्या आनंदाला नवी झळाळी प्राप्त होते, मात्र ग्राहकांना सोने खरेदी करताना नेहमीच एक शंका असते. आणि ती म्हणजे खरेदी केलेलं सोनं योग्य कॅरेटचं आहे का? सोन्याच्या वस्तू खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक टाळावी यासाठी विक्री व्यवहारात एक महत्त्वाचे परिवर्तन घडून येत आहे.  हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विक्री करणं बंधनकारक करण्यात येत आहे. 

 

केंद्र सरकार अंतर्गत भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian standards - BIS) ही संस्था कार्यरत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मानकं अर्थात standards ठरवणं तसंच त्यांच्या तपासणीची पद्धत इत्यादी निश्चित करण्याचं महत्त्वपूर्ण काम ही संस्था वर्षानुवर्षे करत आहे. सोन्याच्या वस्तुंच्या शुद्धतेच्या प्रमाणिकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या हॉलमार्किंग पद्धतीची अंमलबजावणी बीआयएसने ठरवलेल्या मानकांनुसार, त्यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी, जून 2021 मध्ये देशातील 256 जिल्ह्यांमध्ये दागिने हॉलमार्कसह विकणं बंधनकारक करण्यात आलं. त्यानंतर आता वर्षभरानंतर, 1 जून 2022 पासून त्यात आणखी 32 जिल्हे समाविष्ट करण्यात येत असल्याची माहिती एप्रिलमध्येच देण्यात आली होती. हॉलमार्क बंधनकारक करण्याच्या मोहिमेचा अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये विस्तार, त्यानुसार अधिकाधिक विक्रेत्यांची नोंदणी, अधिकाधिक कॅरेट वर्गवारीसाठी हॉलमार्क अनिवार्य करत जाणं अशी अनेक वैशिष्ट्ये टप्प्याटप्प्याने या योजनेत वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे.

नव्या वाहनाची प्रथम विक्री करणाऱ्याला वाहनाचं रजिस्ट्रेशन आरटीओकडे करून नंबरप्लेट मिळवावी लागते हे वाहनाच्या ग्राहकांना माहिती असते. सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग कसं काम करतं याची थोडक्यात माहिती सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करणाऱ्यांना असणे महत्त्वाचे आहे.

सोन्याच्या दागिन्याच्या हॉलमार्किंगमध्ये, प्रत्येक दागिन्यासाठी एक युनिक कोड दिला जातो. HUID या नावानेही तो ओळखला जातो. इंग्रजी अक्षरे आणि अंक यांनी तयार झालेला हा कोड असतो. हॉलमार्किंगमध्ये इतर माहितीसोबत हा दागिन्यांवर नोंदवला जातो. 

आपल्याकडे सोन्याच्या वस्तू असतील तर त्यातील सोन्याची तपासणी करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहक त्यांच्याकडील सोन्याच्या वस्तू बीआयएस मान्यताप्राप्त Assaying and Hallmarking Centre (AHC) येथे घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी निश्चित केलेले शुल्क (Charge) भरून सोन्याच्या वस्तूतील सोन्याच्या शुद्धतेविषयी तपासणी या सेंटरवर करून घेता येते. देशभरात त्यासाठी एएचसी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर त्यावरील HUID च्या मदतीनेही app वरूनदेखील ही पडताळणी करता येते.

avoid-gold-jewelry-fraud
 

या कामी बीआयएसची वेबसाईट ही माहितीचा मोठा स्रोत ठरते आहे. ही योजना लागू असलेल्या जिल्ह्यांची यादी, मान्यताप्राप्त तपासणी केंद्रांची यादी, ज्वेलरची नोंदविण्यात आलेली योजना आणि नोंदणी झालेल्यांची यादी अशा अनेकविध गोष्टींची माहिती बीआयएसच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

ग्राहकांना सोन्याची वस्तू खरेदी करतानाच तिच्यातील शुद्धतेच्या प्रमाणाविषयी खात्रीशीर विश्वासार्ह माहिती मिळावी, या क्षेत्रात असणारी फसवणुकीची भावना कमी व्हावी आणि ग्राहकांना मिळणाऱ्या वस्तुबद्दल त्यांना विश्वास निर्माण व्हावा यासाठी हॉलमार्किंगची योजना महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा आहे. सोन्याच्या खरेदी आणि विक्रीला अशी विश्वासाची झळाळी मिळण्यातच या योजनेचे सार्थक आहे.

पूर्वीपासून ग्राहक खात्रीच्या सोने व्यावसायिकांकडून खरेदी-विक्री करत होते. काही प्रमाणात अजूनही सोन्याची खरेदी ही ओळखीच्या किंवा नेहमीच्या व्यावसायिकाकडून केली जाते. मात्र, आधुनिक काळात ग्राहकांना मिळणाऱ्या दागिन्यांची खात्री कशी आणि कुठून करणार हा एक मोठाच प्रश्न असतो. अशा या काळात ही खात्री आणि विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हॉलमार्किंगसारख्या योजनेद्वारे एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.