भारतीयांच्या कल्पकतेला तोड नाही. देशभरात उद्योगधंद्यांत देखील अशीच कल्पकता दिसू लागली आहे. भारतात नवनवीन व्यावसायिक स्टार्ट अप सुरू करत असून लोकांना आवडेल अशा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच टू व्हीलर (Two Wheeler) म्हणजेच दुचाकी चालकांसाठी एक महत्वाची बातमी आलीये. सध्या दिल्लीत ऑटो एक्स्पो (Auto Expo) सुरू असून देशभरातले ऑटोमोबाईल क्षेत्रातले लोक येथे आपल्या नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. दुचाकी शिकताना किंवा चालवताना अनेकांचा तोल जातो. अनेकदा जीवघेणे अपघात देखील घडतात. याचाच विचार करत काही युवकांनी एकत्र येत ऑटो बॅलन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
विना स्टँड गाडी उभी राहणार!
या दुचाकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी स्टँडशिवाय उभी राहू शकते. आहे की नाही अफलातून आयडिया! यामुळे अपघात टळू शकतो आणि वाहन चालकाला होणारी संभाव्य इजा देखील टळू शकते असे कंपनीने म्हटले आहे. एकदा गाडी चार्ज केली की ती 60 किलोमीटर पर्यंत 65 च्या ताशीवेगाने चालवली जाऊ शकते. या स्पेशल दुचाकीची किंमत 90 हजार इतकी आहे.
जून-जुलै पासून या गाडीच्या ऑर्डर घेतल्या जातील आणि दिवाळी पर्यंत डिलिव्हरी दिली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.