नोएडामध्ये आजपासून ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) सुरू झाला आहे. देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्या यावेळीही त्यांच्या नवीन वाहनांचे प्रदर्शन या एक्स्पोमध्ये करणार आहेत. 11 आणि 12 जानेवारी रोजी ऑटो एक्स्पो मीडियासाठी खुला करण्यात आला आहे. ऑटो एक्स्पो 13 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत लोकांसाठी खुला असेल. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपले एक इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनात सादर केले आहे. मारुतीची ही पहिली ईव्ही भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मारुतीने EVs सिरीज लाँच केली
मारुतीची पहिली EV EVX सुझुकी मोटर कंपनीने विकसित केली आहे. EVX SUV Concept ही एका समर्पित प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. EVX भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने मारुती सुझुकीच्या मोठ्या योजनांचे संकेत देते. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने डिझाईन आणि विकसित केलेली, EVX Concept ही ग्राउंड-अप इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जी भविष्यात ईव्हीच्या सिरीजला सुरुवात करेल, असे कंपनीने म्हटले आहे.
उत्तम ग्राउंड क्लियरन्स
EV ला लांब व्हीलबेस, लहान ओव्हरहॅंग्स आणि अधिक ग्राउंड क्लियरन्ससह सादर केले गेले आहे. मारुती सुझुकी EVX ची लांबी 4,200 मिमी पेक्षा जास्त असेल तर व्हीलबेस सुमारे 2,700 मिमी असेल. मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोमध्ये आपली WagonR फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप, Brezza ची श्रेणी देखील प्रदर्शित केली. कंपनी फ्लेक्स फ्युएल कॉम्प्लायंट वॅगन आर प्रोटोटाइपचे प्रदर्शन करत आहे जो E85 इंधनावर देखील चालू शकतो. मारुतीचे म्हणणे आहे की वाहने 20%-85% इथेनॉलवर चालण्यासाठी विकसित केली गेली आहेत.
मारुतीच्या ईव्हीमध्ये काय खास आहे
60kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित, हे EV 550km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज प्रदान करेल. इलेक्ट्रिक SUV EVX ही लांब व्हीलबेससह भविष्यकालीन डिझाइन दर्शवते. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने भारतातील BEV आणि बॅटरीच्या उत्पादनासाठी 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे.
- डायमेंशन्स: L x W x H: 4,300 मिमी x 1,800 मिमी x 1,600 मिमी
- प्लॅटफॉर्म: नवीन EV प्लॅटफॉर्म
- बॅटरी क्षमता: सुरक्षित बॅटरी तंत्रज्ञानासह 60kWh बॅटरी पॅक
- ड्रायव्हिंग रेंज: 550km पर्यंत