केंद्र सरकारची प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना 'अटल पेन्शन योजने' (Atal Pension Yojana) अंतर्गत पाच कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) ही माहिती दिली. पीएफआरडीए (PFRDA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, या योजनेने 2022 मध्ये चांगली कामगिरी केली. या दरम्यान, 1.25 कोटी नवीन नोंदणी करण्यात आली, तर 2021 मध्ये केवळ 92 लाख नवीन नोंदणी झाली. महिलांच्या नोंदणीचे प्रमाण बघितले तर ते 2021 मध्ये 38 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर पोहोचले आहे.
पेन्शन कोषने सांगितले की, आतापर्यंत 29 बँकांनी केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेले लक्ष्य पार केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी बँक ऑफ इंडिया (Bank of India), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) आणि इंडियन बँक (Indian Bank) यांनी त्यांचे वार्षिक लक्ष्य गाठले आहे, तर प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) श्रेणीतील 21 बँकांनी लक्ष्य गाठले आहे. आरआरबी मध्ये सर्वाधिक नोंदणी झारखंड राज्य ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि बडोदा यूपी बँकेत झाली आहे.
दरमहा 5000 रुपये पेन्शन
कमी पैसे गुंतवून पेन्शनची हमी देण्यासाठी अटल पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय आहे. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. अटल पेन्शन योजनेंतर्गत, खात्यात दरमहा निश्चित योगदान दिल्यास, निवृत्तीनंतर, 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यांनी फक्त 1,239 रुपये गुंतवल्यास 60 वर्षांनंतर प्रति महिना 5,000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये पेन्शनची हमी देत आहे.
असा मिळतो फायदा
सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी, मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5,000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही दर तीन महिन्यांनी हे पैसे दिले तर तुम्हाला 626 रुपये द्यावे लागतील आणि सहा महिन्यांनी दिले तर तुम्हाला 1,239 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी 1,000 रुपये दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला मासिक 42 रुपये द्यावे लागतील.