गुंतवणूक ही फक्त जास्त पैसे असल्यावर करता येते. छोट्या रकमेतून काय गुंतवणूक करणार? त्यातून जास्त परतावा मिळणार नाही. असे अनेक गैरसमज सर्वसामान्य नागरिकांमध्ये असतात. मात्र, असे काही नसून तुमच्याकडे कमीत कमी पाचशे रुपये असतील तरी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते असायला हवे. प्रत्येक महिन्याला तुम्ही छोटी रक्कम जरी दीर्घ काळासाठी गुंतवले तरी 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मात्र, नियमितपणे आणि शिस्तीने तुम्ही गुंतवणूक करायला हवी.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी-
लहान-मोठी कितीही रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवताना योग्य माहिती घेवून अभ्यास करून फंड निवडायला हवा. फक्त जाहिराती, मित्रांनी दिलेली माहिती किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या योजनांना भुलून त्यात गुंतवणूक करु नये. तुमची गुंतवणूकीची क्षमता जरी कमी असली तरी किमान ५०० रुपये तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवू शकता. तसेच जोखीम पत्करण्याची तुमची क्षमता कमी असेल तर सुरक्षित फंडामध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले योग्य राहिल. इक्विटी फंडामध्ये आणि शेअर मार्केटमध्ये जोखीम थोडी अधिक असते. त्यामुळे तुम्ही सुरक्षित योजना कोणत्या आहेत, याचा अभ्यास करुन लवकरात लवकर सुरुवात करायला हवी.
विविध कंपन्यांत गुंतवणूकीची संधी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेक कंपन्यांचे शेअर्स महाग असतात. काही हजार रुपयांना तुम्हाला फक्त एक शेअर मिळले. त्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही तुमची छोटीशीही रक्कम फंड मॅनेजरकडून गुंतवली जाईल. त्याद्वारे तुम्हाला परतावाही चांगला मिळेल. शेअर बाजार कठीण काळातून जात असेल तर म्युच्युअल फंडाच्या युनिटचे मूल्यही कमी होत जाते. मात्र, बाजार तेजीत आला की पुन्हा युनिटचे मूल्य वाढते. तुम्ही जर दीर्घकाळ गुंतवणूक करत असाल तर तात्पुरत्या होणाऱ्या चढउतारांकडे पाहण्याची तुम्हाला गरज नाही.
प्रत्येक महिन्याला करू शकता गुंतवणूक
म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा (SIP) पर्याय देतात. त्यामुळे, तुम्ही नियमित अंतराने गुंतवणूक करू शकता. प्रत्येक महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनीही तुम्ही पैसे गुंतवू शकता. बाजार जेव्हा तेजीत असतो त्यापेक्षा बाजार जेव्हा खाली आलेला असतो त्यावेळी म्युच्युअल फंड खरेदी करण्याची योग्य वेळ समजली जाते. युनिट्सची NAV कमी असल्याने, तुम्हाला मिळणाऱ्या युनिट्सची संख्या त्याच रकमेसाठी जास्त असेल. दीर्घकाळामध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. बाजार कोलमडल्यावर योजनेतून लगेच पैसे काढण्यापेक्षा संयम ठेवावा. किमान पाचशे रुपयांवर जेवढ्या टक्क्यांनी पतावा मिळतो, त्याच दराने कोट्यवधीने गुंतवणूक करणाऱ्यांनाही परतावा मिळतो. मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता या गुंतवणूकीमध्ये आहे.