राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील मोठी स्टील उत्पादक असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीने कोकणात प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारशी करार केला आहे. याअंतर्गत आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड राज्यात 80000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. आर्सेलर मित्तलच्या या गुंतवणुकीने कोकणात हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्सेलर निप्पॉन स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने सह्याद्रीवर भेट घेतली. त्यावेळी कंपनीने राज्यात आणखी गुंतवणूक करण्याचे आणि स्टील उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन सांगितले. कंपनी स्टील उत्पादन आणि इन्फास्ट्रक्चरसाठी किमान 80000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राज्यात किमान पाच हजार एकर जागेची मागणी आर्सेलर मित्तल कंपनीने राज्य सरकारकडे केली आहे. त्याशिवाय ही जमीन समुद्र किनारा किंवा बंदराजवळ असावी. रस्ते आणि रेल्वे यांची कनेक्टिव्हीटी असावी अशी अपेक्षा कंपनीने केली आहे. आर्सेलर मित्तलच्या मागणीवर सरकारने कोकणात जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर सुमारे एक हजार एकर जमीन आर्सेलर मित्तल निप्पॉन कंपनीला देण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे आर्सेलर मित्तलचा मोठा स्टील प्लांट कोकणात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.