जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.
किती लोकांकडे आहे कार ?
लोकसंख्येच्या बाबतीत हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी येथील केवळ 7.5 टक्के लोकांकडे कार आहे, अशी माहिती महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर बरीच रंजक माहिती शेअर केली आहे. यामध्ये या महितीचाही समावेश आहे. 2019 ते 2021 दरम्यान राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ही माहिती पुढे आली आहे.
या अहवालानुसार, देशातील बहुतांश छोट्या राज्यांच्या घरात कार आहेत. अत्यंत लहान राज्यांपैकी गोव्यात देशातील सर्वाधिक कार आहेत. समुद्रकिनारे, चर्च आणि नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात 45.2 टक्के कुटुंबांकडे कार आहेत.
गोव्यात सर्वाधिक कार आहेत, तर बिहारमध्ये सर्वात कमी कार आहेत. बिहारमधील केवळ 2% कुटुंबांकडे कार आहेत. बिहार खालोखाल ओडिशामध्ये 2.7 टक्के, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 2.8 टक्के, झारखंडमध्ये 4.1 आणि छत्तीसगडमध्ये केवळ 4.3 टक्के कुटुंबाकडे कार आहेत.
उत्तर भारतीयांनाही कारची खूप आवड असल्याचे दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 23.7 टक्के, हिमाचल प्रदेशात 22.1, पंजाबमध्ये 21.9, हरियाणामध्ये 15.3, उत्तराखंडमध्ये 12.7, उत्तराखंडमध्ये 5.5, दिल्लीत 19.4, राजस्थानमध्ये 8.2 टक्के लोकांच्या घरी कार आहेत.
महाराष्ट्रात 8.7%, तेलंगणात 6.5%, कर्नाटकात 9.1%, केरळमध्ये 24.2%, तामिळनाडूमध्ये 6.5% लोकांच्या घरी कार आहेत. भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी आर्थिकदृष्ट्या कार घेणे शक्य नाही असा मोठा वर्ग भारतात आहे. दारिद्र्यरेषेखाली खूप मोठी लोकसंख्या आहे. हे एक कार कमी असण्याचे एक महत्वाचे कारण आहे.
कर्ज महाग (loan rates in India )
भारतात मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रमाण मोठे आहे. या वर्गात सामान्यत: कार ही चैनीचा खर्च मानला जातो. यामुळे देखील अनेक जण कार घेणे टाळत असतात. याचबरोबर, कर्ज देखील महाग होत आहेत. कार ही चैनीची वस्तू मानल्याने त्यासाठी इतके व्याज भरण्याची अनेकांची तयारी नसते. शिवाय वैयक्तिक वाहनाची संख्या वाढवून प्रदूषण वाढवण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असाही अनेक जण विचार करत असतात.