HDFC Mutual Fund द्वारे खास डिफेन्स म्युच्युअल फंड योजना लाँच करण्यात आली आहे. न्यू फंड ऑफर 19 मे म्हणजे आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुली झाली आहे. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. हा फंड ओपन एंडेड असून कधीही खरेदी विक्री करता येईल.
देशांतर्गत शस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन
संरक्षण उत्पादने निर्मितीसाठी देशांतर्गत उद्योग उभे करण्यासाठी मागील काही वर्षांपासून भारत प्रयत्नशील आहे. शस्त्रास्त्रे, दारुगोळा, अवजड वाहने, नवीन तंत्रज्ञान, रोबोटिक आणि सूटे भाग परदेशातून आयात करण्यापेक्षा देशांतर्गत कंपन्यांनी तयार करावेत, यासाठी सरकार आग्रही आहे. त्यामुळे वित्तीय तूटही कमी होईल. संरक्षण क्षेत्रात अनेक नव्या कंपन्या उतरत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता एचडीएफसीने खास डिफेन्स सेक्टरवर आधारित फंड बाजारात आणला आहे.
फंड व्यवस्थापनाद्वारे 80% रक्कम संरक्षण क्षेत्रातील थेट आणि संबधित कंपन्यांमध्ये गुंतवण्यात येणार आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, असे एचडीएफसीने म्हटले आहे. हा फंड अभिषेक पोतदार यांच्याद्वारे व्यवस्थापित करण्यात येणार आहे. तर निफ्टी डिफेन्स इंडेक्सवर आधारित हा फंड असेल.
भारताचा संरक्षण क्षेत्रावरील वाढता खर्च
मागील 8 वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात 8 पटींनी वाढली आहे. 85 पेक्षा जास्त देशांना भारत संरक्षण सामुग्री निर्यात करतो. जगातील एकूण डिफेन्स सामुग्री एक्सपोर्टमध्ये भारताचा वाटा सध्या फक्त 1 ते 2% आहे. मात्र, ही टक्केवारी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यांना सरकारचे धोरणात्मक आणि आर्थिक प्रोत्साहनही मिळत आहे. त्यामुळे संरक्षण कंपन्यांच्या प्रगतीसोबत गुंतवणूकदारांच्या पैशांचीही वाढ होऊ शकते.
भारताच्या सीमा चीन, पाकिस्तान या पारंपरिक शुत्रूंपासून सुरक्षित ठेवण्याबरोबरच इतरही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याकडे सरकारचे लक्ष आहे. ड्रोन, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेश, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक क्षेत्रातील कंपन्यांना भविष्यात मोठा वाव आहे. संरक्षण क्षेत्रात भारतीय कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे.
डिफेन्स फंड कोणत्या परिस्थितीत काम करू शकत नाही?
सर्वप्रथम डिफेन्स क्षेत्र हे पूर्णपणे सरकार नियंत्रित आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांवरील काही बंधने येणार. तसेच युद्ध, जागतिक अशांतता या काळात कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. कारण, सरकारी धोरणबदलाचा फटका कंपन्यांना बसू शकतो. संरक्षण सामुग्रीचा सरकार सर्वात मोठा खरेदीदार असतो. मात्र, सरकारने जर संरक्षण क्षेत्रावरील खर्च कमी केला तर कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, भारतीय कंपन्यांना निर्यातीची मोठी संधी आहे.
गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात
डिफेन्स म्युच्युअल फंड हा भांडवली बाजारातील अनुभवी गुंतवणूकदारांसाठी जास्त योग्य राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच दीर्घकाळातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. सुरुवातीलाच गुंतवणूक करत असाल तर थोड्या गुंतवणुकीने सुरुवात करू शकता. भविष्यात चांगला परतावा मिळाल्यानंतर पुन्हा रक्कम वाढवता येऊ शकते. तसेच नवख्या गुंतवणुकदारांनी थोडे थांबून दीर्घ कालावधीत चांगला परतावा मिळत असेल तर विचार करायला हरकत नाही.