भारतीय हवाई क्षेत्रात चंचूप्रवेश करणाऱ्या अकासा एअरलाईन्सला 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठ महिन्यात 602 कोटींचा तोटा झाला आहे. अकासा एअरलाईन्स प्रसिद्ध गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची आहे. अकासा एअरलाईन्सच्या आकडेवारीची माहिती सरकारने संसदेत सादर केली.
एकीकडे गो एअर आर्थिक संकटात सापडली असताना अकासा एअरलाईन्सने मात्र विस्तारावर भर दिला आहे. अकासा एअरलाईन्स ऑगस्ट 2022 मध्ये सुरु झाली होती. 31 मार्च 2023 अखेर कंपनीला 602 कोटींचा तोटा झाला. याच कालावधीत कंपनीला 777.8 कोटींचा महसूल मिळाला असून 1866 कोटी खर्च झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.
खर्चाचा मोठा भाग हा कंपनीच्या सुरुवातीच्या काळात उभारण्यात आलेल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी वापरण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. अकासाने आठ महिन्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या 11 महिन्यांच्या कालावधीत अकासा एअरलाईन्सने हवाई क्षेत्रातील 5% हिस्सा व्यापला आहे. कंपनीने प्रवाशी वाहतुकीत स्पाईस जेट या जुन्याजाणत्या कंपनीला मागे टाकले आहे.
अकासा एअरलाईन्सने नुकताच 19 विमानांची ऑर्डर केली होती. त्यापूर्वी अकासा एअरलाईन्सने बोइंग कंपनीकडे 72 बोइंग 737 मॅक्स एअरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे. सुरुवातीलाच इतकी मोठ्या संख्येने ऑर्डर देणारी अकासा एअरलाईन्स ही अलिकडची पहिलीच कंपनी आहे.
चालू आर्थिक वर्षाअखेर अकासा एअरलाईन्स 100 हून अधिक विमानांची ऑर्डर करेल, असे अकासा एअरलाईन्सचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. अकासा एअरलाईन्स पुढील विस्तारासाठी गुंतवणूकदारांकडून 75 ते 100 मिलियन डॉलर्सचा निधी उभारण्याच्या विचारात आहे.
इंडिगोलाही सुरुवातीच्या काळात करावा लागला संघर्ष
आजच्या घडीची सर्वात यशस्वी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला देखील सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला होता. इंडिगोला पहिल्याच वर्षात 2006-07 मध्ये 174.1 कोटींचा तोटा झाला होता. विमान सेवा सुरु केल्यानंतर तिसऱ्या वर्षी इंडिगो फायद्यात आली. तिसऱ्या वर्षी कंपनीला 82 कोटींचा नफा झाला होता.