भारती एअरटेलची (Bharti Airtel) एअरटेल पेमेंट्स बँक ही एक फिनटेक शाखा आहे. या शाखेनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्यानं 500,000 बँकिंग पॉइंट्सवर आधारवर आधारित पेमेंट सिस्टमसाठी (AePS) हे फेस ऑथेंटिकेशन आणलंय. नुकतीच बँकेनं यासंदर्भातली माहिती दिली. आतापर्यंतचे व्यवहार वेगळ्या प्रक्रियेतून होत होते. यात यूआयडीएआय रेकॉर्डमधल्या ग्राहकाचा आधार क्रमांक (Aadhaar), बोटांचे ठसे (Fingerprint) पडताळून पाहिले जात होते. त्यामाध्यमातून व्यवहार प्रमाणित करण्याची ही प्रक्रिया होती. आता या प्रक्रियेत नव्या सुविधेची भर पडलीय. ग्राहकांना आधार क्रमांकासह फेस ऑथेंटिकेशन (Face authentication) करून आपला व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा पर्याय मिळाला आहे.
Table of contents [Show]
एअरटेलनं दिली सविस्तर माहिती
फेस ऑथेंटिकेशनच्या या सुविधेविषयी एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश अनंतनारायणन यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की आमच्या आधीच्या सुरक्षित सुविधांमध्ये अधिक वाढ करण्यात आलीय. सध्याच्या सुरक्षित आणि सोप्या बँकिंग सोल्यूशन्सच्या गुलदस्त्यात फेस ऑथेंटिकेशनची महत्त्वाची भर पडलीय.
#AirtelPaymentsBank in collaboration with @NPCI rolled out #FaceAuthentication for #AePS at its 500,000 banking points.
— Airtel Payments Bank (@airtelbank) May 2, 2023
Read full story: https://t.co/UmJGxD1ClY
आधार आधारित व्यवहारांमध्ये होणार वाढ
एनपीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणा राय यांनीही या सुविधेबद्दल सांगितलं. आधार आधारित ऑथेंटिकेशनसाठी आणलेली ही नवी सुविधा एक अतिरिक्त मोड म्हणून सादर केल्याबद्दल त्यांनी यूआयडीएआयचे आभार मानले. या सुविधेमुळे आधारवर आधारित व्यवहारांमध्ये वाढ होईल, असे त्या म्हणाल्या.
इतर बँकांसाठीही उपलब्ध होणार पर्याय
फेस ऑथेंटिकेशनची ही सुविधा इतर व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. आर्थिक व्यवहारांव्यतिरिक्त कामांसाठी याचा वापर आधी केला जात होता. शिल्लक चौकशी (Balance inquiry) आणि मिनी-स्टेटमेंट्स (Mini statements) यासाठी हा पर्याय वापरला जात होता. दरम्यान, हा पर्याय एअरटेल बँक लवकरच इतर बँकांच्या ग्राहकांसाठीही आर्थिक व्यवहारांसाठी उपलब्ध करून देईल, असं एअरटेल पेमेंट्स बँकेतर्फे सांगण्यात आलंय.
बँकिंग प्रतिनिधी करतील मदत
फेस ऑथेंटिकेशनच्या सुविधेचा लाभ ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बँकिंग पॉईंट्सवर घेऊ शकतात. यात कोणतीही अडचण असेल तर बँकिंग प्रतिनिधी संबंधित व्यवहार करण्यासाठी मदत करतील, असं बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. व्यवहार अधिक सुलभ पद्धतीनं व्हावेत, यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेनं फीचर फोनद्वारे डिजिटल पेमेंटची चाचणी घेण्यासाठी एनपीसीआयच्या सोबत भागीदारी केलीय. कंपनी टियर-II आणि टियर-III शहरांमध्ये डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआयसोबत इतर वापराच्या केसेसमध्ये इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सचीदेखील (IVR) चाचणी करत आहे.
एअरटेल पेमेंट बँकेविषयी...
भारती एअरटेल ग्रुपअंतर्गत असणारी ही एक उपकंपनी आहे. दिल्ली या ठिकाणी या बँकेचं कार्यालय आहे. जानेवारी 2022ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्या आरबीआय कायदा 1934मधल्या दुसऱ्या शेड्यूलच्या अंतर्गत एअरटेल पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा दिलाय. प्रामुख्यानं फायनान्शिअल सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या जातात. बँकेचे जवळपास 62 दशलक्षाहून अधिक यूझर्स आहेत. तर 500,000पेक्षा जास्त शेजारील बँकिंग पॉइंट्सचं नेटवर्क बँकेनं तयार केलंय.