सुटीच्या हंगामात गगनाला भिडलेले विमान प्रवासाचे दर आता कमी झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई-दिल्ली सारख्या सर्वात व्यस्त आणि सर्वाधिक मागणी असलेल्या रुटवर विमान तिकिटांच्या दरात 4000 ते 4500 रुपयांची घसरण झाली आहे. मॉन्सूनला सुरुवात झाल्याने प्रवाशी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तिकिट दर कमी केल्याचे बोलले जाते.
मे आणि जून महिन्यात सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम असल्याने विमान तिकिटांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली होती. प्रवासाच्या 24 तास आधी तिकिट बुक करणाऱ्या प्रवाशाला सर्वसाधारण भाड्याच्या तुलनेत चार ते पाच पट अधिक किंमत मोजावी लागली होती. एअरलाईन्सनी तिकिट दरात भरमसाठ वाढ केल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवासी संख्या कमी झाली आहे. देशभरात मॉन्सून सक्रिय झाला असल्याने त्याचा परिणाम विमान सेवेवर झाला आहे. मागणी कमी झाल्याने तिकिट दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.
मे-जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिल्ली-मुंबई थेट विमानाचा तिकिट दर 19000 रुपयांपर्यंत गेला होता. तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात 14000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यापूर्वी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या मार्गावरील तिकिट दरांचा आढावा घेतला होता. त्यानंतर विमान कंपन्यांनी तिकिट दरात 1000 रुपयांची कपात केली होती.
शेवटच्या क्षणी बुकिंग करणाऱ्या तिकिटांचे दर देखील कमालीचे स्वस्त झाले आहेत. 24 तास आधी दिल्ली-मुंबईसाठी तिकिट दर केवळ 4500 रुपये इतका आहे. जो जून महिन्यात सरासरी 15000 रुपये इतका होता. अशाच प्रकारे मुंबईहून कोचीसाठी 24 तास आधीचा तिकिट दर तब्बल 16000 रुपयांनी कमी झाला आहे. मुंबई-कोचीसाठी आता 4000 रुपये इतका सर्वात कमी तिकिट दर आहे. यापूर्वी जून महिन्यात सरासरी 20000 रुपये कोचीसाठीचा तिकिट दर होता.
मर्यादित एअर कनेक्टिव्हीटीमुळे भाडे महाग
काही निवडक शहरांपुरता विमान तिकिटाचे भाडे अजूनही जास्त आहेत. ज्या ठिकाणी एअर कनेक्टिव्हीटी मर्यादित आहेत तिथे अजून प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. मुंबई-रांची या सेक्टरसाठी रिटर्न भाडे 16000 रुपये इतके आहे. जुलैच्या पंधरवड्यानंतर मात्र मुंबई-रांची रिटर्न भाडे 10300 रुपये इतके आहे.
गो फर्स्टमुळे इतर कंपन्यांनी घेतला गैरफायदा
- मे महिन्याच्या सुरुवातीला गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीत निघाली.
- कंपनीने 2 मे 2023 पासून सर्वच विमान फेऱ्या रद्द केल्या होत्या. अजून कंपनीने विमान सेवा सुरु केलेली नाही.
- गो फर्स्टकडून दर आठवड्याला किमान 1538 फ्लाईट्स ऑपरेट केल्या जात होत्या.
- अचानक आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कंपनीने विमान सेवा बंद केली.
- या परिस्थितीचा गैरफायदा इतर विमान कंपन्यांनी घेतला.
- गो फर्स्टकडे बुकिंग केलेल्या प्रवाशांना इतर विमानांनी प्रवास करावा लागला. ऐनवेळी बुकिंग करावी लागल्याने जादा दराने तिकिट खरेदी करावे लागले होते.
- ज्या मार्गांवर गो फर्स्टची सेवा होती तिथल्या मार्गावर इतर कंपन्यांचे तिकिट दर प्रचंड वाढल्याचे दिसून आले.
- जून ते सप्टेंबर हा जम्मू-काश्मिर, लेह-लडाखमधला पर्यटन हंगाम मानला जातो.
- या मार्गांवर गो फर्स्ट एअरलाईन्सची कनेक्टिव्हीटी होती. मात्र कंपनी अचानक बंद पडल्याने हजारो पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.
- मे-जून महिन्यात दिल्ली-लेह, दिल्ली-श्रीनगर या मार्गावरील तिकिट दर सरासरी 23000 ते 25000 रुपयांच्या दरम्यान होता.
- आता या मार्गावरील तिकिट दर 15000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.