मुलांच्या परिक्षा संपतायेत आणि आता घराघरात Vacations चे प्लॅनिंग सुद्धा सुरू झालं असणार. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये सहलीचे ठिकाण,तेथील राहण्याचे ठिकाण, तिकडे कुठे फिरणार, काय खाणार असं सगळंच नियोजन करत असतो. तेव्हा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे प्रवास कसा करणार आहोत आणि त्यासाठीचे बजेट काय असणार! हा प्रवास ही सुखकर व्हावा आणि प्रवासात जास्त वेळ जाऊ नये म्हणून आता बरेच लोकं रेल्वे पेक्षा विमान प्रवासाला पसंती देतात. तेव्हा विमान प्रवास करताना तिकीटं कधी बुक करावीत, तिकीटांवर रिफंड मिळतो की नाही अशा आपल्या नानाविध प्रश्नांची उत्तरे आमच्या Mahamoney.com वर जरूर मिळतील. या सगळ्या माहितीसह आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते मुलांच्या विमान प्रवास तिकीटांबद्दल व त्यासंबंधीत इतर आवश्यक मुद्यांबाबत.
Table of contents [Show]
लहान मुलांचे तिकीट दर
बस वा रेल्वे प्रवासामध्ये ठराविक वयाच्या मुलांना मोफत वा कमी तिकीट दरावर प्रवास करता येतो. मात्र, विमान प्रवासाच्या नियम व अटी वेगळ्या आहेत. जरी विमान तिकीट बुक करताना Children असा वेगळा विभाग जरी असला तरी दोन ते 12 वर्षाच्या मुलांचे पुर्ण तिकीटाचे पैसे भरावे लागतात. तर तीन दिवस ते दोन वर्षापर्यंतच्या नवजात बालकाला प्रौढ व्यक्तिच्या तिकिटानुसार 10 टक्के दर आकारला जातो. त्यानुसार देशातंर्गत प्रवासासाठी 1500 रूपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2,350 रूपये मोजावे लागतात.
विमान तिकीट बुक करत असताना किंवा प्रवासाच्या दिवशी जर तुमचे मुल दोन वर्षाचे नसेल तर तुम्हाला तिकीटांचे पूर्ण पैसे भरावे लागतील. थोडक्यात प्रवासाच्या तारखेनुसार बाळाचे तिकीट दर लागू होतात.
समजा, प्रवासाला निघायच्या वेळी तुमचे मुल दोन वर्षाखालील असेल तर तुम्हाला फक्त प्रौढ व्यक्तिच्या तिकिटानुसार 10 टक्के दर भरावा लागतो. मात्र,परतीच्या प्रवासावेळी जर तुमचे मुलं वयाचे दोन वर्ष पूर्ण करीत असेल तर तुम्हाला बाळाच्या परतीच्या तिकीटासाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात.
विमान प्रवासात मुलांना वेगळे सीट मिळते का?
दोन ते 12 वरील मुलांना विमानामध्ये वेगळे सीट उपलब्ध असते. मात्र, दोन वर्षाखालील बाळाला स्वतंत्र सीट मिळत नाही. त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागते. या मध्ये एक अशी गोम आहे की, एक प्रौढ व्यक्ति दोन नवजात बालकांना मांडीवर घेऊन बसू शकत नाही. तशी परिस्थिती असल्यास तुम्हाला दुसऱ्या बालकांसाठी वेगळी सीट घ्यावी लागते.
आपण नवजात बालकाला घेऊन जर प्रवास करत असू तर आपल्याला पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात.
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- आईचे हॉस्पीटलमधील डिस्चार्ज पेपर (Mother's Discharge Summary)
- लस प्रमाणपत्र (Vaccination Certificate)
- पारपत्र (Passport)
जर आपण ही कागदपत्रे सादर केली नाहीत तर आपल्याला नवजात बालकांचेही पूर्ण तिकीटाचे पैसे भरावे लागेल. त्याहुन ही महत्त्वाचे म्हणजे विमानामध्ये जर जागा उपलब्ध असेल तरच बालकाला घेऊन प्रवास करण्यास मुभा आहे अन्यथा नाही. तेव्हा आपल्या बालकांचे वय दर्शवणारी योग्य ते कागदपत्रे तिकीट बुक करतेवेळी आणि प्रवासावेळी सोबत घ्यायला बिल्कुल विसरू नका.
बालकांसाठी विमान प्रवासातील सुविधा
विमान प्रवासावेळी लहान बाळासाठी बेसिनेट (Bassinet) उपलब्ध करून दिले जातात.आपण विमान तिकीट बुक करतेवेळीच या सुविधेसाठी सांगून ठेवणे गरजेचे असते. तसेच प्रत्येक विमान कंपनीनुसार बालकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असतात. तेव्हा तिकीट बुक करते वेळी त्या पेजवर लहान बालकाचे एक चित्र (Icon) असेल त्यावर क्लिक करून काय-काय सुविधा उपलब्ध आहेत हे आपण पाहु शकतो.
तेव्हा बाळाला घेऊन विमान प्रवास करणार असाल तर या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवुन तिकीट बुक करा आणि हो आवश्यक ते कागदपत्रे सोबत घेण्यास विसरू नका.