टाटा समूहाने एअर इंडियाची खरेदी केल्यानंतर कंपनीमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. मात्र कंपनीला पूर्णपणे फायद्यात येण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पहावी लागेल. कारण एअर इंडियाचा तोटा कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात एअर इंडियाला 14000 कोटींचा तोटा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एअर इंडियाने सुधारणांबरोबरच सेवा विस्तारावर भर दिला आहे. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिले आहेत.
एअर इंडियावर टाटा ग्रुपने आतापर्यंत 13000 कोटी खर्च केले होते. मात्र वर्षभरात कंपनीत सुधारणा करण्यात टाटा ग्रुपला मोठा खर्च करावा लागला आहे. याशिवाय नव्या विमानांची देखील ऑर्डर देण्यात आली आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्स या वृत्तसंस्थेनुसार एअर इंडियाने 30 बिलियन डॉलर्सचे नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. 470 नवीन विमाने एअर इंडियाकडून ऑर्डर करण्यात आली आहे. मात्र कंपनीला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 14000 कोटींचा तोटा होण्याची शक्यता या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.
टाटा ग्रुपने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही कंपन्यांमध्ये 100% हिस्सा खरेदी केला होता. यासाठी टाटा ग्रुपने केंद्र सरकारला 2700 कोटींची रोख दिले होते तर एअर इंडियावरील 15300 कोटींचे कर्ज स्वीकारले होते. एअर इंडियाने विहान या योजनेअंतर्गत कंपनीने पुढील पाच वर्षात बाजारात 30% हिस्सा काबीज करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मार्च 2023 मध्ये एअर इंडियाने बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या दोन सरकारी बँकांकडून 14000 कोटींचा कर्ज घेतले होते. एअर इंडियाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2022 अखेर कंपनीवर इंडियावर 15317 कोटींचे कर्ज आहे. एअर इंडियाकडे सध्या 117 विमानांचा ताफा आहे. कंपनीचा स्थानिक बाजारपेठेत 10% हिस्सा असून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तो 12% इतका आहे.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये तोटा वाढला
कंपनीला या वर्षात 19815.9 कोटींचा महसूल मिळाला. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 64% वाढ झाली. मात्र कंपनीचा तोटा 9556.5 कोटींपर्यंत वाढला. त्याआधीच्या वर्षात एअर इंडियाला 7017.4 कोटींचा तोटा झाला होता.
एअर इंडिया ग्रुपमधील कंपन्यांचे एकत्रीकरण होणार
टाटांच्या व्यवस्थापनाने एअर इंडिया समूहातील कंपन्यांचे एकत्रीकरण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार एअर इंडिया एक्सप्रेसमधील एअर एशियाचे विलीनीकरण केले जाणार आहे. त्यातून एक लो कॉस्ट एअरलाईन्स तयार करण्यात येईल. त्याचबरोबर विस्तारा एअरलाईन्स एअर इंडियामध्ये विलीन केली जाणार आहे.