टाटा समूहाची (Tata Group) मालकी असणाऱ्या एअर इंडियाने एअरबस (Airbus) आणि बोईंगसोबत (Boeing) मंगळवारी 20 जून 2023 रोजी नवीन विमान खरेदी करार केला आहे. हा करार फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एअर शो 2023 (Paris Air Show 2023) दरम्यान करण्यात आला. ज्यामध्ये एकूण नवीन 470 विमानांची खरेदी करण्यात आली. हा करार 70 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 5.47 लाख कोटी रुपयांना झाला आहे. याबाबत माहिती देताना एअर इंडियाने सांगितले की, हा करार फेब्रुवारीमध्ये घोषित केलेल्या 70 अब्ज डॉलरच्या फ्लिट एक्सपेंशनचा पुढील टप्पा आहे. खरेदी केलेल्या 470 विमानांमध्ये कोणत्या प्रकारातील विमाने खरेदी करण्यात आली आहेत आणि त्या विमानांची डिलिव्हरी कधी करण्यात येईल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
कोणाकडून किती विमाने खरेदी केली?
एअर इंडिया कंपनी एअरबसकडून 250 नवीन विमाने, तर बोईंगकडून 220 विमानांची खरेदी करणार आहे. कंपनीने 140 A320neo आणि 70 A321neo विमानांसाठी करार केला आहे. तसेच 34 A350-100 आणि सहा A350-900 वाइड-बॉडी जेटचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
190 737 MAX व्यतिरिक्त, बोईंग 20 787 ड्रीमलाइनर्स आणि दहा 777X जेट विमानांची खरेदी करणार आहे. तसेच, एअरलाइन्सकडे 50 737 MAX आणि 20 787 ड्रीमलाइनर्ससह अतिरिक्त 70 विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे. बोईंग कंपनीसाठी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष आणि एअर इंडियाचे एमडी काय म्हणाले?
या करारावर स्वाक्षरी केल्यावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (Tata Sons Chairman N Chandrasekaran) म्हणाले की, या करारामुळे एअर इंडियाची प्रगती व्हायला मदत होईल. तसेच दीर्घकालीन यश यातून मिळेल. आम्हाला खात्री आहे की, या भागीदारीतून आम्ही आधुनिक विमान वाहतूक जगाला देऊ शकतो.
एअर इंडियाचे एमडी-सीईओ कॅम्पबेल विल्सन (Air India MD-CEO Campbell Wilson) यांनी करारावर स्वाक्षरी केल्यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, एअर इंडिया पुढील पाच वर्षात तिच्या सर्व नेटवर्क मार्गांपैकी सर्वात आधुनिक आणि कमी इंधन वापरण्यास कार्यक्षम असेल. याचा थेट फायदा कंपनीच्या उत्पन्नावर होईल. यामुळे कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊ शकेल.
डिलिव्हरी कधीपासून सुरू होईल?
एअर इंडिया 2023 वर्षाच्या अखेरीस Airbus A350 सह नवीन विमानांची डिलिव्हरी सुरू करेल. 2025 च्या मध्यापासून बहुतेक विमानांमधून ग्राहकांना प्रवास करता येईल.
इंडिगोने खरेदी केली विमाने
एअरलाईन कंपनी इंडिगोने एअरबसला 500 विमानाची ऑर्डर दिल्याची घोषणा सोमवारी केली. इंडिगोने सांगितले की, एअरबसला देण्यात आलेली ही ऑर्डर सर्वात मोठी आहे. मात्र इंडिगोने या करारातील आर्थिक तपशील जाहीर केलेले नाहीत. हा करार देखील पॅरिसच्या एअर शो 2023 मध्ये करण्यात आला आहे. ज्यावर केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Union Transport Minister Jyotiraditya Scindia) यांनी ही भारतासाठी सर्वात मोठी वाहतूक क्षेत्रातील संधी असल्याचे म्हटले आहे.
Source: hindi.news18.com