एकदा घर विकत घेतल्यानंतर सहसा कोणीच दुसरे घर घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत, पण तुमचा पैसा असल्यामुळे तुम्हाला हवा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला घराच्या गुंतवणुकीत इच्छा असेल तरच यात तुम्ही पैसे गुंतवा. पण, तुम्हाला परत हप्ते भरणे अनिवार्य राहणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही चांगला पैसा जमा करू शकता. कारण, हप्ते फेडायचे नसल्यामुळे तुमच्याजवळ बराच पैसा शिल्लक राहणार आहे. तो योग्य ठिकाणी गुंतवला तर तुमचाच फायदा होणार आहे. नाहीतर तो पैसा कधी खर्च झाला, हे तुम्हालाही कळणार नाही.
इमर्जन्सी फंडसाठी करा बचत
तुम्ही इमर्जन्सी फंडविषयी ऐकलेच असेल. जर तुम्ही त्यात पैसे आधीच गुंतवले असल्यास, तुम्ही तुमच्या यादीतून ही गोष्ट वगळू शकता. पण, तुमच्याकडे नसल्यास, तुमचा जो पैसा शिल्लक राहणार आहे. तो तुम्ही यासाठी बाजूला काढून ठेवू शकता. तुमची नोकरी गेली किंवा एखादी मोठी समस्या आल्यास, हाच पैसा तुम्ही त्यासाठी उपयोगात आणू शकता. कमीतकमी 6 महिने पुरेल एवढा पैसा तुम्हाला इमर्जन्सी फंडसाठी काढावा लागेल. तुमचा महिन्याचा खर्च 30000 हजार असल्यास, तुम्हाला 2 लाख जमा करण्याचे ध्येय ठेवावे लागेल.
कर्ज व क्रेडिट कार्डचे बिल करा क्लिअर
EMI चा उरलेला पैसा तुम्ही तुमच्यावर असलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डचे बिल फेडण्यासाठी वापरू शकता. कारण, तुम्हाला पर्सनल लोनवर वर्षाला 15% किंवा त्यापेक्षाही जास्त व्याज द्यावे लागते. तसेच, वर्षाला क्रेडिट कार्डवर 35-40% व्याज असते. त्यामुळे EMI चा उरलेला पैसा तुम्ही या गोष्टी फेडायला वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल आधी इमर्जन्सी फंड बनवायचा की लोन चुकवायचे? तर या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टींसाठी सारखेच पैसे काढून ठेवू शकता.
गुंतवणुकीचा बनवा प्लॅन
तुमच्यावरचे सर्व कर्ज तुम्ही फेडले आहे आणि इमर्जन्सी फंडही बनवला आहे. तसेच, तुम्ही आरोग्य आणि जीवन विमाही घेतला आहे. यानंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्याचा प्लॅन करू शकता. तो प्लॅन तयार झाल्यावर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा बॅंकाच्या एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता. यासाठी मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणालाही न विचारता गुंतवणूक केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञांची मदत ही घेऊ शकता आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता. याचबरोबर राष्ट्रीय पेन्शन योजनेतही तुम्ही गुंतवणूक करायचा प्लॅन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही EMI चा पैसा चांगल्या कामी गुंतवू शकता आणि भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या नियोजन करू शकता.