गेल्या काही वर्षात अर्थ आणि वित्त जगतात मोठमोठे बदल होत आहेत. सरकारी पातळीवर देखील याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बँका आणि वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांचा विस्तार व्हावा आणि गावाखेड्यात वित्त सुविधा पोहोचावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. अशातच एअरटेल पेमेंट्स बँकेने आपल्या बँकिंग सेवांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी फोन पे आणि फ्लिपकार्टने पर्सनल लोन देण्यासंदर्भात नवे फीचर्स आणले आहेत. याद्वारे आता ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी बँकांशी संपर्क करायची गरज भासणार नाहीये. डिजिटलायजेशनच्या जमान्यात घर बसल्या ग्राहकांना वित्तीय सुविधा पुरविण्याचा प्रयत्न या क्षेत्रातील नवे खेळाडू करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअरटेल पेमेंट्स बँकेने इतर संस्थांपेक्षा अधिक सुलभ सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय.
डेबिट कार्ड सुविधा देणार
गेल्या काही वर्षांपासून एअरटेल पेमेंट्स बँकेला ग्राहकांची पसंती मिळत असून दिवसेंदिवस ग्राहक संख्येत देखील वाढ होत असल्याचे एअरटेल पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनुब्रता बिस्वास यांनी म्हटले आहे. एअरटेल पेमेंट्स बँक चालू आर्थिक वर्षात, जुलै-सप्टेंबर, 2023 पर्यंत ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी डेबिट कार्ड सुविधा आणणार आहे. या डेबिट कार्डने ग्राहकांना कुठल्याही ATM मधून पैसे काढता येणार आहे. सध्या मास्टरकार्ड (Mastercard) नेटवर्कच्या मदतीने शहरी भागात एअरटेलने ही सुविधा सुरु केली आहे. आता ग्रामीण भागात देखील अशी सुविधा देण्याचा आणि सेवांचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे सहकार्य
एअरटेल पेमेंट्स बँक ही भारती टेलिकॉम या कंपनीने सुरु केली आहे. एअरटेल नेटवर्कची ग्राहकसंख्या लक्षात घेऊन त्यांना बँकिग सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी एअरटेलने कोटक महिंद्रा बँकेशी करार केलाय. यानुसार एअरटेल पेमेंट्स बँकेत भारती एअरटेलची 80.01% तर कोटक महिंद्रा बँकेची 9.99% हिस्सेदारी आहे.
एअरटेल पेमेंट्स बँकेने त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेव गुंतवणुकीची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही योजना IndusInd बँकेच्या सहकार्याने चालवली जाते आहे.