Aditya-Birla Groupच्या BGH प्रॉपर्टीने मुंबईतमध्ये 220 कोटी रूपयाचा बंगला खरेदी केला आहे. 10 एप्रिल 2023 रोजी हा खरेदी व्यवहार पूर्ण झाला आहे. दक्षिण मुंबईतमध्ये हा बंगला असून त्याचं नाव सनी व्हिला असं आहे. या बंगल्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी तब्बल 13.20 कोटी रूपये मोजले आहेत.
सनी व्हिलाची मालकी
एर्नेवाझ दुबाश या पारसी व्यक्तिच्या मालकीचा हा बंगला होता. दुबाश यांचे 2013 मध्ये निधन झाले. त्यावेळी त्यांच्या मुत्यूपत्रात नमुद केल्यानुसार त्याच्या संपत्तीच्या विक्रीचा संपूर्ण हिस्सा हा त्यांनी स्थापन केलेल्या पेरोशॉ धुंजीशॉ बोल्टन चॅरिटीज या ट्रस्टला दिला जाणार आहे. दुबाश यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या साथीने मार्च 1960 मध्ये या ट्रस्टची निर्मिती केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण व रूग्णालयातील गरिब रूग्णांच्या औषधोपचाराची काळजी घेतली जाते.
सनी व्हिलाचे वैशिष्ट्ये
सनी व्हिला हा एका पारसी कुटुंबियांचा बंगला आहे. साऊथ मुंबईतल्या एमएल डहाणुकर मार्गावरच्या कारमाईकल रोडवर हा बंगला आहे. 18 हजार 494 स्क्वेअर फुट ही बंगल्याची एकुण जागा असून त्यापैकी 190 स्क्वेअर फुट जागेवर गराज आहे.
220 कोटी रूपयाच्या या बंगल्यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या BGH प्रॉपर्टीने तब्बल 13.20 कोटी रूपयाची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. एर्नेवाझ खरशेदजी दुबाश यांनी त्यांच्या संपत्तीची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या एक्झिक्यूटर्सच्या माध्यमातून हा व्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये आदि एन पालिया, डेरियस सोराब कंबट्टा, सायरस सोली नल्लासेठ, आदि हिरजी जहांगीर, चेतन महेंद्र शाह यांचा समावेश आहे.
बिर्ला ग्रुपचे जाटिया हाऊस
बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांनी 2015 साली मलबार हिल परिसरातील जाटिया हाऊस खरेदी केलं होतं. हा बंगला त्यावेळी त्यांनी 425 कोटी रूपयात खरेदी केलेला. 2015 सालचा सर्वात महागडा घर खरेदी व्यवहार म्हणून जाटिया हाऊसच्या खरेदी व्यवहाराची चर्चा झाली होती. या घराची जागा 30 हजार स्क्वेअर फुट आहे.
जाटिया हाऊस हे मुंबईतील नामांकित अशा मलबार हिल परिसरात असून अगदी समुद्राच्या जवळ आहे. 1950 साली हा बंगला बांधण्यात आला होता. एमपी जाटीया ग्रुपचे पद्ममजी पल्प आणि पेपर मिल्स लि. कंपनीचे अरूण आणि श्याम जाटिया हे दोघे भाऊ या घराचे मालक होते. मात्र, कालांतराने परदेशी स्थायिक होण्याच्या कारणास्तव 2015 साली जाटिया बंधूनी त्यांच्या घराची विक्री केली.
जाटिया हाऊसचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या घराच्या अगदी बाजुला वैज्ञानिक होमी भाभा वास्तव्य करत असलेला बंगला आहे. या बंगल्याची सुद्धा 2014 साली विक्री झाली आहे.
याच भागामध्ये पूनावाला ग्रुप आणि सीरम इन्स्टिट्युटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी अमेरिकन सरकारकडून खरेदी केलेले लिंकन हाऊस ही प्रॉपर्टी आहे. या 50 हजार स्क्वेअर फुटच्या प्रॉपर्टीसाठी पूनावाला यांनी 750 कोटी रूपये मोजले आहेत.