ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष(Adipurush) चित्रपट शुक्रवारी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. जय श्रीराम असा गजर करत लाखो प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केलेली पाहायला मिळाली. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 11 जून 2023 पासून सुरू झाले होते. पौराणिक महाकाव्य रामायणावर (Ramayan) हा चित्रपट आधारित असल्याने अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. ॲडव्हान्स बुकिंगमुळे शुक्रवारी संपूर्ण सिनेमागृह हाऊसफुल झाले होते. या चित्रपटात श्रीरामाच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), सीतेच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senan) आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानला (Saif Ali Khan) पाहायला मिळाले. हा चित्रपट हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नेमका किती गल्ला जमवला, जाणून घेऊयात.
पहिल्याच दिवशी 95 कोटींचा गल्ला
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृह फुल झालेली पाहायला मिळाली. 'Sacnilk' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आदिपुरुष चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. हा गल्ला हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेतील आवृत्तीमधून जमा झाला आहे. चित्रपटाच्या हिंदी (Hindi) आवृत्तीने पहिल्याच दिवशी 35 कोटींची कमाई केली. तर तेलगू आवृत्तीने 58.5 कोटी रुपयांची सर्वाधिक कमाई केली. त्याशिवाय कन्नड आवृत्तीमधून 40 लाख रुपये, मल्याळम आवृत्तीमधून 40 लाख रुपये आणि तमिळ आवृत्तीमधून 70 लाख रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाचे एकूण बजेट जाणून घ्या
2023 मधील सर्वात मोठे बजेट असणारा चित्रपट म्हणजे 'आदिपुरूष'. 500 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट 16 जून रोजी शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यासाठी अजय अतुल (Ajay-Atul) यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे हिंदी आणि तेलगू भाषेत हा चित्रपट एकाच वेळी शूट करण्यात आला आहे.
विकेंडमुळे कमाई वाढेल
चित्रपट देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झाला असून पुढे सलग दोन दिवस विकेंडच्या सुट्ट्या असल्याने आदिपुरुष बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असे बोलले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या सिनेमागृहात दुसरा कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, ज्याचा फायदा आदिपुरुष चित्रपटाला होत आहे.