Adani Enterprises FPO: अदानी इंटरप्रायजेसने फॉलो ऑन पब्लिक इश्यूसाठी सेबीकडे पेपर्स फाईल करण्याचा निश्चय केला असून येत्या दोन दिवसांत कंपनी फॉलो ऑन पब्लिक ऑफरसाठी पेपर फाईल करणार आहे. या फॉलो ऑन पब्लिक ऑफरमधून कंपनीने 20,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निश्चय केला. अदानी ग्रुपला व्यावसायिक बॅंकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर कंपनी अधिकृतरीत्या पेपर्स फाईल करणार आहेत. हे पेपर्स मंगळवारी किंवा बुधवारी जमा केले जातील, असे सांगितले जात आहे.
नोव्हेंबर, 2022 मध्ये अदानी इंटरप्रायजेसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत एफपीओच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी अशाप्रकारे एफपीओच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही कंपनीने निधी उभारलेला नाही. यापूर्वी यस बॅंकेने (Yes Bank) 2020 मध्ये फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 15,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला होता आणि हा आकडा आतापर्यंतचा सर्वांत मोठा होता. पण आता अदनी समुहाने अदानी इंटरप्रायजेसच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ (Follow-On Public Offer-FPO) आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा करण्याचा निश्चय केला.
अदानी ग्रुपला हा एफपीओ बजेटच्या पूर्वी आणून त्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच बजेट सादर होण्यापूर्वीच कंपनीला एफपीओ सादर करून त्यातून निधी उभारणे आणि गुंतवणूकदारांना शेअर्स इश्यू करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यामध्ये कंपनी इश्यूच्या किमतीत किरकोळ गुंतवणूकदारांना 5 ते 7 टक्के सवलत देण्याचा विचार करत आहे.
अदानी इंटरप्रायजेसमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 27.37 टक्के
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे (Bombay Stock Exchange-BSE) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अदानी इंटरप्रायजेसमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा सुमारे 72.63 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 27.37 टक्के आहे. सोमवारी (दि. 16 जानेवारी) अदानी इंटरप्रायजेसचा शेअर 2.8 टक्क्यांनी खाली येऊन 3,619 रुपयांवर बंद झाला होता. तर मंगळवारी सकाळी तो 3,620 रुपयांवर ओपन झाला आणि दुपारी सत्र संपल्यावर 36,39.35 रुपयांवर बंद झाला.
एफपीओ म्हणजे काय? What is FPO?
एफपीओ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर) ही एक अशी प्रक्रिया आहे; जी कंपनी शेअर मार्केटमध्ये यापूर्वीच लिस्टेड आहे. ती कंपनी गुंतवणूकदारांसाठी किंवा कंपनीच्या भागधारकांसाठी खासकरून प्रमोटर्ससाठी नव्याने शेअर्स इश्यू करते. ‘एफपीओ’चा वापर कंपनी आपला इक्विटी बेस वैविध्यपूर्ण करण्यासाठी करत असते. एफपीओची प्रक्रिया ही आयपीओप्रमाणेच असते. आयपीओमध्ये जसे कंपनीचे उद्दिष्ट आणि कंपनीची सर्व माहिती सेबीकडे जमा करावी लागते. त्याप्रमाणे एफपीओमध्येही कंपनीला सेबीकडे कागदपत्रे जमा करून त्याची माहिती द्यावी लागते.