Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

StartUp : अक्षय कुमार, विरेंद्र सेहवागच्या साथीनं पुण्यातल्या स्टार्टअपची भरारी

StartUp : अक्षय कुमार, विरेंद्र सेहवागच्या साथीनं पुण्यातल्या स्टार्टअपची भरारी

StartUp : अभिनेता अक्षय कुमार आणि माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांची साथ मिळाल्यानं एका स्टार्टअपनं चांगलीच भरारी घेतलीय. पुण्याचं हे स्टार्टअप आता जवळपास 53 देशांमध्ये पसरलंय. म्हणजेच यांच्या उत्पादित वस्तू विविध देशांमध्ये पाठवल्या जात आहेत. जाणून घेऊ नेमकं काय आहे बिझनेस मॉडेल?

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि आपल्या कारकिर्दीत स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलीय. होय. हे खरं आहे. त्यांच्या साथीनं आणि स्टार्टअप सुरू करणाऱ्याच्या मेहनतीनं या नवख्या कंपनीनं नवीच भरारी घेतलीय. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांनी एकाच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलीय. टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म (टीबीओएफ) नावाचं पुण्यातलं हे कृषी स्टार्टअप आहे. अक्षय कुमार आणि विरेंद्र सेहवाग यांनी प्री-सीरीज ए फंडिंग फेरीत एकूण 14.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय, अशी माहिती सत्यजीत हांगे यांनी दिली. सत्यजीत हे टीबीओएफच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

2019 मध्ये स्थापना झाली

अक्षय कुमार, विरेंद्र सेहवाग यांनी गुंतवलेला निधी टीबीओएफची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे निर्माण करण्यासाठी तसंच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला जाईल, असं सत्यजीत हांगे यांनी सांगितलंय. अशाप्रकारच्या गुंतवणुकीमुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागात उत्पन्नाची साधनं कमी असतात. शेती हाच प्रमुख स्त्रोत आहे. या निमित्तानं ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण जीवनमानही उंचावेल, अशी अशा हांगे यांनी व्यक्त केली.

रासायनिक प्रक्रियेला फाटा

टीबीओएफची स्थापना 2019मध्ये सत्यजीत आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी केली होती. कल्चर्ड एटू तूप (Cultured A2), बाजरी आणि बाजरीचं पीठ, लाकडी घाण्यावरचं तेल, नट बटर यासह सेंद्रिय आणि नैसर्गिक घटकांवर आधारित विविध उत्पादन कंपनीमार्फत विकली जातात. यासाठी विविध फळे, भाज्या, तृणधान्ये, शेंगा आणि कडधान्ये यांचा वापर केला जातो. रासायनिक प्रक्रियेला फाटा देऊन केवळ नैसर्गिकरित्या (Organically) उत्पादनांची निर्मिती करण्यावर कंपनीचा भर आहे.

53पेक्षा जास्त देशांमध्ये जातो माल

पुण्यातल्या या तरुणांचा आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न चांगला आणि सकारात्मक आहे. यातला एक गुंतवणूकदार म्हणून सेहवागनं आपलं मत मांडलं. तो म्हणाला, की टीबीओएफच्या शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासाच्या मिशनला माझं पूर्ण सहकार्य असणार आहे. मी उत्साही तर आहेच मात्र आशावादीदेखील आहे, की भविष्यात या व्यवसायाचा आणखी विस्तार होईल. शेतकर्‍यांच्या एकूणच जीवनमानावर आणि भारतातल्या तसंच भारताबाहेरच्या लोकांच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. हे सर्व पाहून आनंद होतोय.

उत्पादनांना मोठी मागणी

अक्षय कुमार म्हणाला, की टीबीओएफचा उद्देश खूपच चांगला आहे. त्यांच्या विचारानं मी अत्यंत प्रभावित झालोय. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना सक्षम करण्याचं काम या दोन बंधूंमार्फत होतंय. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना समाधान आहे. सध्या कंपनी जवळपास 53पेक्षा जास्त देशांमध्ये आपला माल विकते. भारताबद्दल बोलायचं झाल्यास देशातल्या विविध शहरांत कंपनीचा विस्तार झाला असून विविध उत्पादनांना चांगली मागणी आहे. अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स वेबसाइट, मोबाइल अॅप, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि फूड सुपरस्टोअर्सद्वारे कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करते.