Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Savings Schemes : आता लहान मुलांसाठीही आधार सक्तीचं, काय आहेत नवे सरकारी नियम?

Small Savings Schemes : आता लहान मुलांसाठीही आधार सक्तीचं, काय आहेत नवे सरकारी नियम?

लहान बचत योजना आधार प्रमाणीकरण नियम 2023 : लहान बचत योजना आणि आधार कार्डाच्या संदर्भात सरकारनं एक निर्णय घेतलाय. नवी नियमावली जाहीर केलीय. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या नव्या नियमांनुसार विविध बचत योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा असणार आहे. विशेषत: सरकारपुरस्कृत योजनांना आधार अनिवार्य असणार आहे.

सध्या विविध बचत योजना (Saving Schemes) कार्यान्वित आहेत. यात सरकारी योजनांसह खासगी बँका आणि इतर संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचाही समावेश आहे. सरकारपुरस्कृत विविध राष्ट्रीय बचत योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार आता अनिवार्य (Aadhaar mandatory) करण्यात आलंय. लहान मुलांसाठी उघडण्यात आलेली किंवा अल्पवयीन मुलांच्या नावानं उघडलेली बचत खाती अशा बाबतीत आधार अनिवार्य असणार आहे.

'या' योजनांना आधार आवश्यक

राष्ट्रीय बचत योजनेच्या अंतर्गत, पीपीएफ (Public Provident Fund), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Saving Scheme), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Scheme), मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme), सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit) आणि आवर्ती ठेव (Recurring Deposit) यासारख्या लहान बचत योजना खाती पोस्ट विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही अधिकृत खाजगी क्षेत्रातील बँकांमार्फत लागू केल्या जातात.

31 मार्चलाच अधिसूचना जारी

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधी 31 मार्च 2023ला नवी अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, मुलांच्या लहान बचत खात्यांसाठी आधार क्रमांक किंवा आधार अधिसूचना प्राप्त असल्याचा पुरावा अनिवार्य असणार आहे. कोणत्याही राष्ट्रीय बचत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा आधार क्रमांक सादर करणं बंधनकारक आहे किंवा आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे अधिसूचनेत नमूद आहे.

लहान मुलांसाठीच्या योजना

बचत योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही मुलानं, ज्याच्याकडे आधार क्रमांक नाही किंवा अद्याप आधारसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी नोंदणी करण्यापूर्वी पालकांच्या संमतीच्या अधीन राहून आधार नोंदणीसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. योजनेनुसार त्याला आधार मिळवण्याचा अधिकार आहे, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. 10 वर्षांच्या वरील मुलांसाठी उघडता येणाऱ्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Savings Account), राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (National Savings Recurring Deposit), राष्ट्रीय बचत वेळ ठेव (National Savings Time Deposits), राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना (National Savings Monthly Income Scheme), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) आणि किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) यांचा समावेश आहे.

आधी आधार मग योजना

अल्पवयीन मुलासाठी पालक पीपीएफ खातं उघडू शकतात. तर 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावानं सुकन्या समृद्धी खातं उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दुसरीकडे प्रौढांसाठीचे नियमही अशाचप्रकारचे आहेत. लहान बचत योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांना आधार अनिवार्य असणार आहे. कोणत्याही योजनेत पात्र असलेल्या व्यक्तीनं आधार क्रमांकाचा पुरावा सादर करावा किंवा आधार प्रमाणीकरण करावं, असं अधिसूचनेत म्हटलंय. तर योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं, ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही किंवा त्यांनी आधारसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी योजनेसाठी नोंदणी करण्यापूर्वी आधार नोंदणीसाठी अर्ज करायला हवा, असंदेखील अधिसूचनेत म्हटलं आहे.