महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी स्थानिक पंचायतीने आकारलेला कर (Tax) पूर्ण भरणाऱ्या गावातील ग्रामस्थांना 10 लाख रुपयांचे अपघात विमा (Insurance) संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. निलंगा तालुक्यातील पंचिनचोली गावात शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत हा अनोखा निर्णय घेण्यात आला. पंचिनचोलीच्या सरपंच (गावप्रमुख) गीतांजली हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, जिथे त्यांचे माजी सरपंच श्रीकांत साळुंखे यांनी पंचायत कराच्या 100 टक्के भरणा केल्यावर ग्रामस्थांना 10 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाचे सर्व सदस्यांनी स्वागत करून एकमताने पारित केला.
उपक्रम राबवण्यामागील कारण
खरे तर लोकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी पंचायतीने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. श्रीकांत साळुंखे यांनी पीटीआयला सांगितले की, "पंचिनचोली गावाची लोकसंख्या 5947 आहे आणि जवळपास 930 करदाते आहेत. ग्रामस्थांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत गावाच्या विकासासाठी आणखी काही प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.” तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, ओडिशा, यूपी आणि उत्तराखंड वगळता, पंचायत क्षेत्रात असलेल्या इमारतींवर कर लावण्याचा अधिकार भारतातील सर्व राज्यांतील ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे.
यापूर्वीही अनेक ठिकाणी असा निर्णय घेण्यात आला
पंचिनचोली ग्रामपंचायतीप्रमाणेच पनवेल महापालिकेनेही करदात्यांसाठी असा उपक्रम राबवला होता. महापालिका प्रशासनाला मालमत्ता कर भरणाऱ्यांना सहा लाखाचा अपघात विमा मिळेल अशी घोषणा केली होती. सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीने सुद्धा काही वर्षांपूर्वी करदात्यांसाठी असा अनोखा उपक्रम राबवला होता.
ग्रामपंचायतीची कामे
त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत (गाव पातळीवर), पंचायत समिती (मध्यवर्ती स्तरावर) आणि जिल्हा परिषद (जिल्हा स्तरावर) यांचा समावेश होतो. राज्य विधिमंडळ पंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना कर वसूल करण्याचे अधिकार देते. ग्रामस्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, दवाखाने, जलस्रोतांची साफसफाई व दुरुस्ती, सार्वजनिक जमीन, मार्ग, बाजार आणि जत्रे व कुरणांची व्यवस्था ग्रामपंचायती करतात. जन्म-मृत्यूचा हिशोब ठेवतात. शेती, उद्योग आणि व्यवसायांची प्रगती, रोगांचे प्रतिबंध, स्मशानभूमीची देखील काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे, पंचायत समिती (मध्यवर्ती स्तरावर) आणि जिल्हा परिषद देखील त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींप्रमाणेच कार्य करतात.