India Forex Reserves: भारताचा परकीय चलनसाठा 9 जूनपर्यंत 593.75 अब्ज डॉलरपर्यंत घसरल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि.16 जून) माहिती दिली. मागील आठवड्यात यामध्ये जवळपास 1.3 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. विदेशी चलनाबरोबरच भारताच्या सोन्याच्या गंगाजळीतही 18.3 कोटी डॉलरची घसरण झाली आहे.
9 जून रोजी म्हणजे मागच्या शुक्रवारी भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये 1.3 अब्ज डॉलरची घसरण झाल्यामुळे तो येऊ थेट 593.749 अब्ज डॉलरवर आला आहे. त्याच्या अगोदरच्या आठवड्यात परकीय चलनामध्ये 5.93 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. त्यामुळे भारताचा एकूण चलनसाठा 595.067 अब्ज डॉलर झाला होता. यापूर्वी म्हणजे 2021 मध्ये हा साठा 645 अब्ज डॉलर इतका होता. त्यात वेगवेगळ्या कारणांमुळे घट होत गेली.
परकीय चलनसाठ्याबरोबरच सोन्याच्या साठ्यामध्ये देखील जवळपास 18.3 कोटी डॉलरची घट झाली आहे. सध्या भारताच्या गंगाजळीत 45.374 अब्ज डॉलरचे सोने राहिले आहे.
परकीय चलनसाठ्यात भारत पहिल्या 5 देशांमध्ये
परकीय चलनसाठ्यात भारताचा पहिल्या 5 देशांमध्ये क्रमांक लागतो. यामध्ये भारतासह चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशिया हे देश आहेत. परकीय चलनसाठ्यात परकीय चलन (आरबीआयकडे असलेले परदेशी चलन), आरबीआयच्या साठ्यात असलेले सोने, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेल्या भांडवलातील वाटा आणि आयएमएफमधील एकूण भांडवलापैकी देशाचा परकीय चलनातील वाटा हा गृहित धरला जातो.