मागील काही वर्षात अनेक स्मॉल-कॅप फंडामधील गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळाला आहे. काही वेळा गुंतवणूकदारांना 100% परतावा मिळाला आहे. मात्र, यामध्ये जोखीमही आहे. स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. एखाद्या स्मॉल कॅप फंडने (Investment In Small cap funds) चांगला परतावा दिल्यानंतर त्यातून बाहेर कधी पडावे, असाही अनेकांना प्रश्न पडतो. या सगळ्यामध्ये तुमचे गुंतवणूक करताना नियोजन हवे. लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीतून जसा चांगला पतावा मिळतो, तसाच या गुंतवणूकीतून धोके काय आहेत, याची माहिती हवी. चांगला फंड निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
जोखीम टाळू शकत नाही -
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जोखीम टाळू शकत नाही. नावानुसारच स्मॉल कॅप फंड मॅनेजर लहान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. यातील काही कंपन्यांना उज्वल भविष्य असते. मात्र, अनेक कंपन्यांच्या गव्हर्नन्स आणि काम करण्याच्या पद्धतीत त्रुटी असतात. यातील काही बुडीतही निघतात. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरची किंमत एका दिवसातही शून्य होऊ शकते. तसेच चांगल्या निर्णयामुळे उत्तम परतावाही मिळतो. मात्र, जोखीम तुम्ही टाळू शकत नाही.
दीर्घकाळ गुंतवणूकीचा पर्याय
स्मॉल कॅप फंडातील जोखीम तुम्ही पूर्णपणे टाळू शकत नाहीत. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तात्पुरते चढउतार आले तरी फरक पडणार नाही. दीर्घ काळामध्ये तोट्यातील योजना पुन्हा नफ्यात येऊ शकतात. सुमारे दहा वर्षांपर्यंत गुंतवणूक ठेवण्याची तुमची तयार असेल तरच या फंडात गुंतवणूक करा अन्यथा न केलेलीच बरी.
जास्त गुंतवणूक टाळा
स्मॉल कॅप फंड स्कीममध्ये जास्त गुंतवणूक टाळा. तुमचा कोअर पोर्टफोलिओ स्मॉल कॅप फंडला बनवू नका. कारण, या फंडमध्ये अस्थिरता आणि चढउतार जास्त असतात. तुम्हाला स्थिर परतावा मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्ही सारासार विचार करुन जोखीम किती घ्यायची हे ठरवावे. या फंडांमध्ये गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि फंड कंपनीद्वारे केलेली गुंतवणूक योग्य राहील. कारण त्यांना या क्षेत्रातील कंपन्यांबाबत सखोल ज्ञान आणि माहिती असेल. चांगल्या कंपन्या शोधण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. योग्य कंपन्या निवडून दीर्घकाळात चांगला परतावा मोजक्याच फंड मॅनेजर्सनी मिळवून दिला आहे. तसेच लहान कॉर्पस असलेल्या फंडात गुंतवणूक करा.
स्मॉल कॅप फंडातून जास्त परतावा मिळत असल्याचे पाहून लगेच त्यात गुंतवणूक करू नका. तसेच फंड तोट्यात जाताना दिसला की, लगेच गुंतवणूक काढून घेऊ नका. दीर्घ काळाचा विचार करताना जोखीम घेण्याची क्षमता ठेवा. जास्त काळासाठी पैसे गुंतवले तरच चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. बाजार कोसळला असताना घाबरून जाऊ नका. संयम ठेवला तर पुन्हा बाजार सुरळीत होऊन चांगला परतावा मिळेल.