भारतीय वंशाचे अब्जाधीश व्यावसायिक पंकज ओसवाल आणि राधिका ओसवाल यांनी जगातील सर्वांत महागडा व्हिला स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केला आहे. या व्हिलाची किंमत 1,649 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. स्वित्झर्लंडमधील जिनीव्हापासून अवघ्या 15 मिनिटांवर असलेल्या जिनजिन्स गावामध्ये हा व्हिला आहे.
पंकज ओसवाल यांनी विकत घेतलेला व्हिला 4.30 लाख स्क्वेअर फुटांचा असून, तो व्हिला वारी या नावाने ओळखला जातो. बर्षाच्छदित प्रदेशात 100 वर्षांपूर्वी उभारलेल्या या व्हिलासाठी ओसवाल दाम्पत्याला तब्बल 200 मिलिअन डॉलर खर्च आला आहे. ओसवाल यांनी खरेदी करण्यापूर्वी या व्हिलाचा ताबा क्रिस्टीना ओनासिस हिच्याकडे होता. हिचे वडिल ग्रीकमधील सर्वांत मोठे शिपिंग व्यावसायिक अॅरिस्टॉटल ओनासिस हे आहेत. हा व्हिला जगातील टॉप महागड्या घरांमध्ये गणना होणारा व्हिला आहे.
'व्हिला वारी'मध्ये 12 बेडरूम, 17 बाथरूम, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, हेलिपॅड, सिनेमा थिएटर, बार आणि स्पा अशा एक ना अनेक चैनीच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याचे इंटेरिअर डिझाईन प्रसिद्ध इंटेरिअर जेफ्री विल्कीस यांनी केले असून त्यांनी यावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
कोण आहेत पंकज ओसवाल?
पंकज ओसवाल हे उद्योजक अभय कुमार ओसवाल यांचे सुपूत्र असून त्यांची संपत्ती 3 बिलिअन डॉलर इतकी आहे. पंकज ओसवाल हे जगभर पसरलेल्या ओसवाल ग्रुपचे मालक आहेत. त्यांचे पेट्रोकेमिकल, रिअल इस्टेट, खते या सेक्टरमध्ये कंपन्या असून अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि भारतात त्यांच्या मालकीच्या खाणी सुद्धा आहेत. पंकज ओसवाल आणि राधिका ओसवाल यांचे 25 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना 2 मुली आहेत. सध्या अब्जाधीश कुटुंब स्वित्झर्लंडमध्ये राहत आहे. त्यापूर्वी ते ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते.