भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्यानंतर ज्या नागरिकांकडे दोन हजारांच्या नोटा आहेत त्यांनी बँकेत जाऊन या नोटांचा भरणा करावा अथवा नोटा बदलून घ्याव्यात अशा सूचना आरबीआयने नागरिकांना दिल्या होत्या.
आरबीआयच्या या निर्णयानंतर नागरिकांनी बँकेत जाऊन पैसे जमा केले होते. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन हजारांच्या 93 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. याचाच अर्थ अजून केवळ 7% नोटा सध्या चलनात आहेत. आतापर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झालेल्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
31 ऑगस्टपर्यंत चलनात 2,000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 0.24 लाख कोटी इतके आहे. येत्या काही दिवसांत यापैकी बहुतांश रक्कम बँकेत जमा होणार आहे. याचे कारण म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना पैसे बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या नाही तर नागरिकांना तोटा सहन करावा लागू शकतो.
बहुतांश नोटांचा भरणा
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 87% दोन हजारांच्या नोटा या बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्या ना कुठल्या योजनेत, बचत खात्यात या नोटा जमा केल्या आहेत. तर उर्वरित 13% नोटा नागरिकांनी बदलून घेतल्या आहेत.
दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि त्याचा भरणा करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ दिला गेल्यामुळे बँकांना देखील नागरिकांना सहकार्य करणे सुलभ झाले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीवेळी नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला होता, तो यावेळी सहन करावा लागलेला नाहीये.
31 सप्टेंबरनंतर काय होणार?
आरबीआयने याआधीच स्पष्ट केले आहे की 2000 च्या नोटा या चलनातून रद्द केल्या जाणार आहेत मात्र त्याची चलन म्हणून वैधानिक मान्यता कायम राहणार आहे. असे असले तरी नागरिकांनी दिलेल्या मुदतीत त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बदलून किंवा बँकेत जमा करून घ्यायच्या आहेत. 31 सप्टेंबरपर्यंत ज्या नोटा बँकेत जमा होणार नाहीत, त्याचे काय होईल याबाबत अजून आरबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र नागरिकांनी RBI च्या सूचनांची वाट न बघता लवकरात लवकर नजीकच्या बँकेत जाऊन 2000 रुपयांच्या नोटा जमा कराव्यात.