निवृत्तीनंतर वृद्धापकाळात दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शन महत्त्वाची ठरत असते. पेन्शनमुळे वृद्धांना निवृत्तीनंतर इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. अनेकजण नोकरी करत असतानाच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करतात. परंतु, प्रत्येकालाच गुंतवणूक करणे शक्य होत नाही. मात्र, सरकारद्वारे काही पेन्शन योजना राबवल्या जातात, ज्याचा फायदा वृद्ध व्यक्तींना निवृत्तीनंतर होऊ शकतो. सरकारच्या अशाच 5 महत्त्वाच्या निवृत्ती योजनांबाबत जाणून घेऊया.
Table of contents [Show]
अटल पेन्शन योजना
भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान व्हावी या उद्देशाने अटल पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली होती. 18 ते 40 वयोगटातील कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. असंघटित क्षेत्रातील व्यक्ती देखील निवृत्तीनंतरच्या सुरक्षेसाठी ठराविक रक्कम या योजनेत गुंतवू शकते. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिन्याला 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये रक्कम मिळेल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत गरिबी रेषेखालील 60 ते 79 वयोगटातील व्यक्तीला दरमहिन्याला 200 रुपये पेन्शन मिळते. तर 79 वर्षापुढील व्यक्तींना दरमहिन्याला 500 रुपये पेन्शन स्वरुपात दिले जातात. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थीला स्वतःहून कोणतीही रक्कम गुंतवावी लागत नाही.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)
सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय पेन्शन योजनांपैकी ही एक योजना आहे. ही पेन्शनसोबतच गुंतवणूक योजना देखील असून, योजनेचे नियमन PFRDA द्वारे केले जाते. वृद्धांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्राप्त व्हावी या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकता. एका वर्षात या योजनेत केवळ दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
प्रधानमंत्री वय वंदन योजना
सरकारची प्रधानमंत्री वय वंदन योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यावतीने (LIC) राबवली जाते. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. गुंतवलेल्या रक्कमेवर ठराविक व्याजदर देखील मिळते. गुंतवणुकीनुसार दरमहिन्याला ठराविक रक्कम पेन्शन स्वरुपात मिळेल.
वरिष्ठ पेन्शन विमा योजना
प्रधानमंत्री वय वंदन योजनेप्रमाणेच ही योजना देखील एलआयसीच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर लाभार्थींना वर्षाला जवळपास 9 टक्के दराने पेन्शन स्वरुपात रक्कम मिळते. पेन्शनची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वर्षाला मिळावी, यापैकी एका पर्यायाची देखील निवड करता येते. तसेच, या योजनेंतर्गत कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.