वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनबाबत पुन्हा एकदा नवा विक्रम केला गेलाय. मागील महिन्यात, म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये जीएसटी संकलनात वार्षिक 11 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या महिन्यात देशभरात जीएसटी पोटी 1.60 लाख कोटी रुपयांचे संकलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या आखत्यारीत मह्सूल विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख 43 हजार 612 कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते, यावर्षी संकलनात 11% वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसेंदिवस जीएसटी भरणा करण्याबाबत व्यापारी सकारात्मकता दाखवत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे महसूल विभागाने म्हटले आहे.
महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी याबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे तसेच जीएसटी संकलनाचा लेखाजोखा देखील मांडला आहे. देशाच्या जीडीपीत सातत्याने सकारात्मक वाढ होत असताना सामान्य नागरिकांच्या खरेदी क्षमतेत देखील वाढ होते आहे, त्यामुळे वस्तू आणि सेवा कर भरण्यात नागरिकांनी देखील रस दाखवला आहे.
ऑगस्ट महिन्यात १ लाख ५९ हजार कोटी रुपयांहून अधिक #GST महसूलाचं विक्रमी संकलन.
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 1, 2023
यापैकी सुमारे २८ हजार कोटी रुपयांहून अधिक #CGST तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक #SGST च्या रूपात जमा.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ११% अधिक कर संकलन. @FinMinIndia #GSTCollection @DDNewslive pic.twitter.com/05f44Lhbcs
कर संकलनात वाढ होणार
ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात वाढ नोंदवली गेली असतानाच येत्या काही महिन्यात ही वाढ अशीच कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. घर, जमिनी खरेदी, इलेक्ट्रीकल कार, इलेक्ट्रीकल सामान यांची खरेदी गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान जीएसटी संकलनात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
मेरा बिल, मेरा अधिकार
जीएसटी परिषदेने ‘Mera Bill Mera Adhikar’ ही योजना जाहीर केली आहे. सामान्य नागरिक मोबाईल ॲपवर जीएसटी बिल अपलोड करून 10 लाख ते 1 कोटींपर्यंतचे बक्षिसे जिंकू शकणार आहेत. सामान्य नागरिकांना जीएसटी बिल घेण्याची सवय लागावी आणि त्यांचे प्रोत्साहन वाढावे म्हणून ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून गुजरात, आसाम, पुंदुचेरी, दादरा नगर हवेली, दिव दमण या राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे येणाऱ्या काळात जीएसटी संकलनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.