Zoom layoff: झूम व्हिडिओ कम्युनिकेशन क्षेत्रातील कंपनीने 1,300 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15% टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. कंपनीतल्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. मागील काही दिवसांपासून माहिती तंत्रज्ञान, निर्मिती आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. झूम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी ब्लॉग पोस्ट लिहून कर्मचारी कपातीची माहिती दिली.
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन एज्युकेशनची डिमांड वाढल्याने ऑनलाइन मिटिंग, लेक्चर आणि कॉलसाठी झूम व्हिडिओ अॅपची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. जगभरात झूम कंपनी नावारुपाला आली होती. मात्र, कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर झूम कंपनीचा व्यवसाय मंदावला. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही खर्चात कपात केल्याने झूम कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला आहे.
CEO च्या पगारातही 98% कपात
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी पुढील आर्थिक वर्षात स्वत:चा पगार 98% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ते फक्त 2% पगार घेतील. तर कंपनीचे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20% कपात करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना बोनसही देण्यात येणार नाही.
कर्मचारी कपातीमागील कारण (Reason behind Zoom Layoff)
जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थिरता गरजेची आहे, असे एरिक यांनी पत्रात म्हटले आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन आमच्या ग्राहकांसाठी चांगली सेवा दिली. मात्र, कंपनीची वाढ शाश्वत आहे की नाही, हे ओळखण्यात आम्ही कमी पडलो. आमचे प्राधान्यक्रम योग्य ठरवायला हवे होते, मात्र, तसे झाले नाही, असे ही एरिक यांनी म्हटले.
ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे, त्यांना पुढील चार महिन्यांचा पगार, आरोग्य विमा, बोनस आणि कंपनीचे काही शेअर्स देण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना दुसरा जॉब मिळण्यासाठी ट्रेनिंग, कोचिंग आणि इतर सर्व मदत करण्यात येईल, असे एरिक यांनी जाहीर केले.
आघाडीच्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात (IT and Tech layoff)
फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 13% म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली आहे. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांत जगभरातील कंपन्यांनी 1 लाख 24 हजार कर्मचारी काढले, तर 2022 मध्ये 1 लाख 53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. कोरोना काळात आयटी कंपन्यांच्या नफ्यात अचानक वाढ झाली होती. मात्र, त्यास उतरती कळा लागली आहे.