19 वर्षाचे वय असणाऱ्या मुलांना तुम्ही काय करता? हा प्रश्न विचारला, तर त्यावर आपल्याला वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळतात. काही जण म्हणतील आम्ही कॉलेजमध्ये शिकत आहोत, मित्र मैत्रिणींसोबत टाईमपास करतो किंवा भटकंती करतो, तर काहीजण म्हणतील नोकरी करतोय. पण हाच प्रश्न ज्यावेळी कैवल्य वोहराला विचारला त्यावेळी उत्तर आलं, 19 व्या वर्षी मी झेप्टो कंपनीचा संस्थापक व सीईओ (Founder and CEO of Zepto Company) आहे.
झेप्टो ही ऑनलाईन किराणामालाची डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. केवळ 1 वर्षात या कंपनीचे मूल्यांकन 7,300 कोटी रुपये इतके आहे. तर कैवल्यची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. त्याचा हा थक्क करणारा प्रवास नक्की कसा होता आणि त्याला ही आयडिया कुठून सुचली जाणून घेऊयात.
झेप्टोची कल्पना कशी सुचली?
ही गोष्ट आहे मुंबईत राहणाऱ्या कैवल्य वोहराची. कैवल्यचं शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण झालं. पुढे त्याला कॉम्प्युटर इंजिनियरिंग करायचं होतं, म्हणून त्याने अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात (Stanford University in America) प्रवेश घेतला. परंतु त्याला अभ्यासापेक्षा जास्त रस हा स्टार्टअपमध्ये होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून पहिला स्टार्टअप व्यवसाय उभारला. ज्याचं नाव होतं ‘Gopool’. अभ्यास सांभाळून कंपनी चालवणं कैवल्यला कठीण जाऊ लागलं म्हणून त्याने शिक्षण सोडून मुंबईची वाट धरली.
कॉलेजमध्ये असतानाच तो आणि त्याचा मित्र किराणामाल ऑर्डर करायचे. या मालाची डिलिव्हरी व्हायला किमान 2 दिवस लागायचे. त्यांने हिच समस्या हेरली आणि स्वतःचा नवीन स्टार्टअप झेप्टो (Zepto) सुरू केला. कोविड महामारी दरम्यान 2021 मध्ये झेप्टोची पायामुळे रोवली गेली. कोविडमध्ये झेप्टोने कमी वेळात लोकांना किराणामाल पोहचवून मदत केली. याच काळात झेप्टो झपाट्याने विकसित झालं. आज कंपनीत 1000 कर्मचारी आणि डिलिव्हरी एजंट झेप्टो सोबत काम करत आहेत.
एका वर्षात 900 दशलक्ष डॉलर्सचे मूल्यांकन
झेप्टोची सुरुवात कोविडमध्ये झाली. लोकांसाठी हा काळ मुश्किलीचा होता, मात्र झेप्टोसाठी हा कालावधी संधी निर्माण करून देणारा होता. याच काळात असंख्य ग्राहकांना झेप्टोने आपली सेवा दिली आणि केवळ एकाच महिन्यात झेप्टोने 200 दशलक्ष डॉलरची कमाई केली. लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि 1 वर्षात कंपनीने मूल्यांकन 900 दशलक्ष डॉलर्स इतके झाले. भारतीय चलनात ही रक्कम 7300 कोटींच्या पार पोहचली. कंपनीच्या भरभराटीसोबत कैवल्य वोहराच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. आजच्या घडीला कैवल्यकडे 1200 कोटींची संपत्ती आहे आणि तो देशातील सर्वात श्रीमंत तरुण बनला आहे.
10 मिनिटात डिलिव्हरी करण्याची संकल्पना यशस्वी झाली आणि...
सुरुवातीच्या टप्प्यात झेप्टोच्या ग्राहकाला किराणा मालाची डिलिव्हरी करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागत होता. हा वेळ कमी केला, तरच आपण या शर्यतीत टिकू हे कैवल्यने ओळखले आणि केवळ 10 मिनिटांत डिलिव्हरी देण्याची संकल्पना राबवली. या संकल्पनेला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यातून कंपनीला रिपीट ऑर्डर्स दिल्या. 10 मिनिटांत डिलिव्हरी ही संकल्पना कैवल्यने विकसित केली आणि त्याने बाजारपेठेतील ब्लिंकिट, बिग बझार या स्पर्धकांना शर्यतीतून मागे टाकले. या संकल्पनेमुळे काही महिन्यातच कंपनीने मोठा नफा कमवला.एका वर्षात कंपनीचे मूल्यांकन 50 टक्क्यांनी वाढून 7300 कोटींवर पोहचले. कंपनीची प्रगती पाहून Y Combinator आणि Glad book capital स्टार्टअपकडून 60 दशलक्ष डॉलर्सची निधी कंपनीने उभारला. झेप्टो सध्या देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये कार्यरत असून आपला व्यवसाय विस्तारत आहे.
Source: dnaindia.com