हल्ली शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीला मागे टाकत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला जातोय. आधुनिकतेची कास धरल्याने अनेकांना लाखोंचा नफाही होतोय. अलीकडे बरेच जण शेतीमध्ये एकदा लागवड करून दीर्घकाळ नफा मिळवत आहेत. अशा प्रकारच्या शेतीमध्ये अनेकजण सागाच्या शेतीला प्राधान्य देतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतीबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामधून तुम्ही 70 वर्ष नफा कमवू शकता.
ही शेती आहे सुपारीची. भारतात सुपारीचे (Betel Nut Farming) उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जगातील एकूण सुपारीच्या उत्पादनापैकी 50 टक्के सुपारीचे उत्पादन हे फक्त भारतात घेतले जाते. भारतातील धार्मिक सणांपासून ते लोकांच्या आहारातही सुपारीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एकदा लागवड करून दीर्घकाळासाठी सुपारीच्या शेतीतून उत्पन्न मिळवता येते. ते कसे मिळवायचे? जाणून घेऊयात.
सुपारीची शेती कशी करावी?
सुपारीची लागवड (Betel Nut Farming) कोणत्याही जमिनीत करता येते. तरीही चिकणमाती असलेली जमीन त्यासाठी केव्हाही चांगली. म्हणूनच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीच्या बागा पाहायला मिळतात. ही झाडं नारळाच्या झाडासारखी 50 ते 60 फूट उंच असतात. साधारण 7 ते 8 वर्षानंतर या झाडाला फळं येतात. हा कार्यकाळ मोठा वाटत असला तरीही दीर्घकाळ कमाईसाठी सुपारीची शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.
सुपारीच्या शेतीसाठी जमीन 7 ते 8 pH मूल्याची असावी. यासाठी तापमान 28 अंशांच्या जवळपास असावे जेणेकरून पिकास पोषक वातावरण मिळते. सर्वप्रथम जमिनीची नांगरणी करून त्यात सुपारीची रोपे लावण्यासाठी 2.7 मीटर खोल खड्डा तयार करावा. त्यांचा आकार 90 बाय 90 सेमी इतका असावा. सुपारीची रोपे नर्सरीमध्ये तयार केली जातात. या रोपांच्या मदतीने ही लागवड करावी.
सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रजातीची रोपे उपलब्ध आहेत. त्यामध्ये मंगला, सुमंगला, श्रीमंगला, मोहित नगर, हिरेहल्ली बटू, श्रीवर्धनी ही मुख्य आहेत.सुपारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच केंद्रीय वृक्षारोपण पीक संशोधन संस्थेने दोन संकरित वाणांची निर्मिती केली आहे. या वाणांचा वापर केल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव सर्वात कमी होतो. आणि उत्पन्नही सर्वात जास्त मिळते.
सुपारी लागवडीसाठी रोपवाटिका तयार करून ठराविक अंतरावर सुपारीची रोपे लावली जातात. रोपं विकसित झाल्यानंतर त्यांची शेतात लागवड केली जाते. महत्त्वाचं म्हणजे लागवड करताना शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी लागते. जुलै ते ऑगस्ट महिन्यात सुपारीच्या रोपांची लागवड करणं केव्हाही चांगलं. झाडे तयार झाल्यावर 10 ते 20 किलो शेणखत प्रत्येक झाडाला द्यावे. याशिवाय 40 ग्रॅम स्फुरद, 100 ग्रॅम नत्र आणि 140 ग्रॅम पालाश आवश्यकतेनुसार द्यावे. तण नियंत्रणासाठी वर्षातून दोन ते तीन वेळा खुरपणीही करावी. नोव्हेंबरच्या मध्य ते फेब्रुवारी आणि मार्च ते मे या महिन्या दरम्यान झाडांना पाणी द्यावे.
कमाई किती होईल?
सुपारीच्या झाडाला लागलेली फळं तीन चतुर्थांश पिकल्यानंतर काढली जातात. बाजारात सुपारी चांगल्या भावाने विकली जात आहे. सध्या किलोच्या भावाने त्याची किंमत सुमारे 400 रुपये ते 700 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत एका एकरात सुपारीची लागवड केल्यास बंपर नफा मिळू शकतो. तुम्ही 1 एकर जमिनीवर सुपारीची झाडे लावली असतील, तर एका झाडाकडून किमान 50 हजारापर्यंतच्या सुपाऱ्या मिळतील. झाडांच्या संख्येनुसार यातील नफा कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, विशेष म्हणजे ही झाडं सुमारे 70 वर्षे नफा देतात. त्यामुळे एकदा लागवड केली आणि थोडीफार जोपासना केली, तर तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.