Aadhar Update Process: आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने एक नवीन सेवा आणली आहे. तुमच्याजवळ जर तुमच्या नावाचे एकही कागदपत्र किंवा पुरावा नसेल तरीही तुम्ही तुमचे आधार अपडेट करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या परिवारातील प्रमुखाची (Head of Family-HOF) परवानगी घ्यावी लागणार आहे.
आपल्या समाजात असेही लोक आहेत; ज्यांच्याजवळ काहीच अधिकृत कागदपत्रे किंवा पुरावे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आधारसाठी नाव नोंदवताना किंवा आधारमधील माहिती अपडेट करताना अडचण येते. कारण त्यांच्याकडे पुरावा म्हणून अधिकृत अशी कागदपत्रे नसतात. आधारने यावर उपाय म्हणून ‘हेड ऑफ फॅमिली’च्या बेसवर कुटुंबातील इतर सदस्यांना आधारमधील माहिती अपटेड करण्याची परवानगी दिली आहे. आधारच्या या नवीन पर्यायाचा वापर करून कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मदतीने कोणीही आपल्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करू शकतो.
या सुविधेचा कोणाला फायदा होऊ शकतो
आधारमधील ‘हेड ऑफ फॅमिली’ हा सुविधेचा वापर ज्यांच्याजवळ पुरावा म्हणून काहीच कागदपत्रे नाहीत, अशांसाठी होणार आहे. अशा व्यक्ती आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मदतीने आधार कार्डमधील आपला डेटा अपडेट करू शकतात. जवळचे नातेवाईक, पती-पत्नी, आई-वडिल हे याचा लाभ घेऊ शकतात. UIDAIने याबाबत 3 जानेवारी, 2023 रोजी एक नोटीफिकेशन प्रसिद्ध केले. या नोटीफिकेशनद्वारे आधारने हेड ऑफ फॅमिली पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मदतीने किंवा त्याच्या कागदपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर सदस्यांना आधारवरील माहिती अपडेट करता येणार आहे.
हेड ऑफ फॅमिलीचे कोणते कागदपत्रे लागू शकते?
हेड ऑफ फॅमिली पर्यायाचा वापर करताना कुटुंबातील प्रमुखाचे रेशन कार्ड, मार्कशीट, लग्नाचे सर्टिफिकेट, पासपोर्ट या कागदपत्रांची मदत होऊ शकते. कुटुंब प्रमुखाचे हे पुरावे वापरून इतर सदस्या त्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. यासाठी कुटुंब प्रमुखाला एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागणार आहे.
ऑनलाईन पोर्टलद्वारे करू शकता आधार अपडेट
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने संमती पत्र दिल्यानंतर इतर सदस्य My Aadhar Portal द्वारे आधारमध्ये माहिती अपडेट करू शकतात. पोर्टलवर जाऊन आधार अपडेट या टॅब अंतर्गत Address Update हा पर्याय निवडून तिथे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा आधार क्रमांक Head of Family म्हणून टाकावा लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीसोबत असणारे नाते सिद्ध करेल असे कागदपत्रे जोडावे लागेल आणि त्यानंतर 50 रुपये शुल्क भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यानंतर 30 दिवसांत कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने ही प्रक्रिया मान्य करणे आवश्यक आहे. ती मान्य झाली की आधार कार्डमधील माहिती अपडेट केली जाते.