आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. त्यामुळे तुमचे पॅनकार्ड आता निष्क्रिय (Inactive) झाले आहे. पण तुम्हाला तर यावर्षी कापून गेलेला टीडीएस पुन्हा मिळवण्यासाठी आयटीआर भरायचा होता. पण आता काय करणार? कापलेला टीडीएस सरकार दरबारी जमा होणार!

चिंता करू नका मित्रांनो. इन्कम टॅक्स विभागाने तुमची ही अडचण लक्षात घेऊन तुमच्यासाठी एक पर्याय ओपन केला आहे. तुम्ही तुमच्या निष्क्रिय ठरलेल्या पॅनकार्डच्या मदतीने आयटीआर भरू शकता. त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण ही सेवा तुम्हाला मोफत मिळणार नाही. यासाठी तुमच्याकडून दुप्पट दंड वसूल केला जाऊ शकतो किंवा तुमचा जास्तीचा टॅक्स कापला जाऊ शकतो किंवा तुमची रिफंडची रक्कम तुम्हाला उशिरा मिळू शकते.
इन्कम टॅक्स विभागाने 18 जुलै रोजी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की, जे NRI (Non-Resident Indian) आणि OCI (Overseas Citizens of Indian) आहेत. ज्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे. त्यांनी आपल्या विभागातील अॅसेसमेंट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. इथे इन्कम टॅक्स विभागाने एक लिंक सुद्धा दिली आहे. या लिंकच्या मदतीने तुम्ही तुमचा पॅनकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून तुमचा अॅसेसिंग अधिकारी आणि त्या ऑफिसचा पत्ता मिळवू शकता. अशाप्रकारे ज्यांचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे. ते इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आयटीआर भरण्यासाठी मदत घेऊ शकतात.