Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hallmarking of Gold Jewellery: ‘या’ ॲपच्या मदतीने तुम्हीही तपासा, तुमचं सोनं खरे की खोटे

Hallmark of Gold Jewellery

Hallmark of Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी त्यावर हॉलमार्क नंबर असणे बंधनकारक आहे. आजकाल खोटा हॉलमार्क नंबर प्रिंट करून सोन्याची विक्री केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होताना पाहायला मिळत आहे. अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये. यासाठी कशी काळजी घ्यावी हे आपण समजून घेणार आहोत.

सोनं हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अडचणीच्या काळात याच सोन्याचे दागिने तारण ठेवून किंवा विकून आर्थिक अडचण सोडवता येते. त्यात सोन्याचे दागिने हा महिलांचा सर्वांत आवडता प्रकार. त्यामुळेच घरातील स्त्रिया सोन्याचे दागिने बनवण्यावर जास्त भर देतात. सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हॉलमार्क नंबर प्रिंट करणे बंधनकारक केले आहे. ज्यामुळे ग्राहकांची सोने खरेदी करताना फसवणूक होणार नाही. मात्र असे असले तरीही आजकाल खोटे हॉलमार्क नंबर प्रिंट करून सोन्याची विक्री केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. असा प्रकार आपल्यासोबतही घडू नये यासाठी सराफाकडून सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क नंबर तपासणे गरजेचे आहे. तो कसा तपासायचा, त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अल्फान्यूमॅरिक हॉलमार्क काय आहे? 

1 एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हॉलमार्क नंबर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी हा नंबर 4 अंकी होता. याच नंबरवरून ग्राहकांना आपले सोने खरे आहे की खोटे हे समजते. हा नंबर दागिन्यांवर अल्फान्यूमॅरिक फॉरमॅटमध्ये प्रिंट करण्यात येतो. या युनिक क्रमांकामध्ये सर्वप्रथम हॉलमार्क चिन्ह प्रिंट करण्यात येते. त्यानंतर दागिना किती कॅरेटचा आहे आणि तो 100 टक्क्यांपैकी किती टक्के सोन्यामध्ये बनला आहे; हे दर्शवते. आणि सर्वांत शेवटी HUID नंबर देण्यात आलेला असतो. एचयूआयडी म्हणजेच, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक आहे. हा क्रमांक दागिन्याच्या शुद्धतेबद्दल माहिती देतो. हा अल्फान्यूमेरिक कोड दागिना खरा आहे की खोटा, याची माहिती देण्यासाठी उपयोगी ठरतो.  

‘या’ ठिकाणी हॉलमार्क नंबर तपासा

सध्या काही सराफांकडून कमी कॅरेटचा दागिना चुकीची प्रिंट करून जास्त कॅरेटचा आहे, असे सांगत दागिने विकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक ‘BIS Care App’ वापरू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याची शुद्धता तपासता येते. सरकारमान्य या ॲपवर ग्राहकांना हॉलमार्क नंबर तपासता येतो. ज्यामध्ये तुमचे सोने खरे आहे की खोटे हे एका क्लिकवर समजेल. याशिवाय सोन्याच्या दागिन्यासंदर्भातील कोणतीही तक्रार ग्राहक BIS Care App वर नोंदवू शकतात.

अशा प्रकारे तपासा सोन्याचा दागिना खरा की खोटा

तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांवर प्रिंट करण्यात आलेला हॉलमार्क नंबर तपासायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला Play Store वर जावे लागेल आणि सर्च करावं लागेल ‘BIS Care App’. हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला ओपन करावे लागेल आणि मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ‘Verify HUID’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक  केल्यानंतर एक नवीन Tab ओपन होईल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या दागिन्यावरील शेवटचे 6 अंक ‘Enter’ करावे लागतील. ज्या क्षणी तुम्ही 6 अंक Enter कराल, त्याच क्षणी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनवर दागिन्याच्या संदर्भातील तपशील पाहायला मिळतील.

या तपशीलामध्ये तुम्ही कोणत्या सराफाकडून दागिना खरेदी केला आहे. दागिन्याचा रजिस्टर नंबर काय, दागिन्यावरील हॉलमार्क सेंटर कुठे आहे, कोणत्या तारखेला हॉलमार्क लावण्यात आला आहे, याची माहिती पाहायला मिळेल. यासोबत सोन्याच्या शुद्धतेबद्द्ल आणि ते किती कॅरेटमध्ये बनले आहे, याबद्दलही माहिती मिळेल.

तक्रारही नोंदवता येईल

ही तपासणी केल्यानंतर जर तुमच्या लक्षात आले की, सराफाने सांगितल्यानुसार तुमचा सोन्याचा दागिना तितक्या कॅरेटमध्ये नाही, तर अशा परिस्थितीत तुम्ही BIS Care App वर तक्रार नोंदवू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे दागिना खरेदी केलेले बिल असणे गरजेचे आहे.

तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही BIS Care App वरील ‘Complaint’ आयकॉनवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. यामध्ये तुमच्या सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क नसेल किंवा तुमच्या हॉलमार्कचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असेल. सोन्याच्या क्वालिटी संदर्भात तक्रार असेल, तर तुम्ही त्याठिकाणी तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे आणि सराफाचे काही डीटेल्स भरावे लागतील. ही माहिती भरून सबमिट केल्यानंतर 15 ते 20 दिवसात BIS कडून तुम्हाला उत्तर देण्यात येईल आणि तुमची तक्रार सोडवली जाईल.