Wholesale Price Index September, 2022 : गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भारताचा घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 10.70 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) 12.41 वाढला होता, तर जुलैमधील डब्ल्यूपीआय 13.93 टक्क्यांवरून 14.07 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये डब्ल्यूपीआय दर 11.80 टक्के होता, अशी माहिती, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली.
सरकारने वाढत्या महागाईची आकडेवारी देताना याचं कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने सप्टेंबर, 2022 मध्ये महागाई वाढण्याचे कारण देताना म्हटले आहे की, खनिज तेल, खाद्य पदार्थ, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ, रासायनिक उत्पादने, धातू, वीज, वस्त्रोद्योग आदी वस्तुंच्या किमतीत गेल्यावर्षी सुद्धा याच महिन्यात वाढ झाली होती. त्यामुळे यावर्षीही ती वाढ दिसून येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
खाण्याच्या पदार्थांचा दर 11.03 टक्क्यांपर्यंत खाली
सप्टेंबर महिन्यात खाद्यपदार्थांचा दर हा 11.03 टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्ट महिन्यात हाच दर 12.37 टक्के एवढा होता. दरम्यानच्या काळात गहू, डाळी आणि फळांच्या किमती कमी झाल्यामुळेच सप्टेंबर महिन्यात खाण्याच्या पदार्थांचा दर कमी झाला. सप्टेंबरमध्ये फळांचे दर 4.51 टक्क्यांपर्यंत खाली आले. जे ऑगस्टमध्ये 31.75 टक्के होते. तर डाळींचे भाव -0.28 टक्क्यांनी तर कांद्याचे भाव -20.96 टक्क्यांनी घसरले. गव्हाचा भाव ऑगस्टमध्ये 17.35 टक्के होता. तो सप्टेंबरमध्ये 16.09 टक्क्यांपर्यंत खाली आला. याचबरोबर अंडी, मांस आणि मासे यांचे दरही बऱ्यापैकी खाली आले आहेत.
भाजी आणि दुधाच्या दरात सप्टेंबरमध्ये वाढ!
सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर 39.66 टक्क्यांनी वाढले. ते गेल्या महिन्यात 22.29 टक्के होते. बटाट्याचा भाव 43.56 टक्क्यांवरून 49.79 टक्के एवढा झाला. दुधाच्या दरातही सप्टेंबरमध्ये 5.55 टक्क्यांनी वाढ झाली. ऑगस्टमध्ये हा दर 4.78 टक्के होता.
इंधन आणि ऊर्जाच्या दरात किंचित घट!
गेल्या महिन्यात इंधन आणि ऊर्जा विभागातील उत्पादनांचा दर किंचित कमी होऊन 32.61 टक्क्यांवर आला. जो ऑगस्टमध्ये 33.67 टक्के होता. एलपीजीचे दर ही 19.75 टक्क्यांवरून 8.45 टक्क्यांपर्यंत खाली आले.
दरम्यान, ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे (Consumer Price Index-CPI) सप्टेंबर महिन्यात मोजली गेलेली देशातील किरकोळ महागाई ही गेल्या 5 महिन्यातील उच्चांकी (7.41 टक्के) असल्याचे म्हटलंय.