Worried about Retirement: वयाची पन्नाशी ओलांडली की,दररोजच्या 9 ते 5 च्या जॉबचा कंटाळा येतो. अन् रिटायरमेंटचे वेध लागतात. पण रिटायरमेंट वाटते तितकी सोपी नाही. पुरेशी आर्थिक तरतूद असेल तर रिटायरमेंट सोपी वाटते. नाहीतर सतत पैशांची अडचण भासते. निवृत्तीसाठीची तरतूद एका रात्रीत जमा करता येत नाही. अर्थात त्यासाठी योग्य नियोजन करावे लागते. तरुणपणात हे नियोजन केले तर उतारवयासाठी एक चांगला निधी तयार होऊ शकतो.
पण काही जणांना ऐन उतारवयात निवृत्तीसाठी जमापुंजी करावी, याची जाण येत नाही किंवा त्याव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या असल्यामुळे रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करता येत नाही. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार, 45 ते 55 वयोगटातील व्यक्तींकडे निवृत्तीसाठी साधारण पैसे जमा असतात. त्यातही अनेक गोष्टींचे नियोजन असते. अशावेळी एखाद्याचे आयुर्मान चांगले राहिले आणि त्याने वयाची 65 - 70 वर्षे पूर्ण केली तर त्याला तिथपर्यंतच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध नसते. यासाठी आपण काही बचतीच्या आपण काही साध्यासोप्या उपाययोजना पाहणार आहोत.
Table of contents [Show]
पगाराच्या सहापट रकमेची बचत
तुम्ही जर वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पगाराच्या किमान सहापट रक्कम बचत केलेली पाहिजे. तुमचे वय सध्या 45 आहे, आणि तुम्हाला 50 हजार रुपये पगार आहे. तर तुमच्याकडे आता किमान 3.50 लाखांची बचत असायला हवी. तुम्ही जर आतापर्यंत या नियमानुसार बचत केली नसेल तर तुम्ही आतापासून त्याची सुरुवात करू शकता. नोकरीच्या चांगल्या संधीबरोबर तुम्ही गुंतवणुकीचा तुमचा पोर्टफोलिओसुद्धा निर्माण करू शकता.यामुळे तुम्हाला थोडेसे उशिरा निवृत्त व्हावे लागेल. पण निवृत्त झाल्यानंतर तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात निवृत्तीसाठी फंड जमा झालेला असेल.
कर्जातून लवकर मुक्त व्हा!
निवृत्तीनंतर सुखमय आयुष्य जगण्यासाठी तुम्ही रिटायरमेंट फंड तयार करत असाल तर ती एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर तुम्ही कर्जमुक्त असणे तितकेच गरजेचे आहे. नाही जर तुम्ही जमा केलेला निधी हा कर्ज फेडण्यातच खर्ची पडेल. यासाठी लवकरात लवकर कर्जाच्या विळख्यातून स्वत:ला मोकळे करा. निवृत्तीपर्यत कर्जाचे हफ्ते भरण्याऐवजी ते लवकर कसे संपवता येईल, याचा विचार करा. कर्जाच्या हफ्त्यातून जर तुमची लवकर सुटका झाली तर, तुमची बचत आपोआप वाढेल आणि त्यामुळे तुमचा रिटायरमेंट फंडदेखील वाढेल.
रिटायरमेंटचे नियोजन करा
नियोजन हा प्रगतीचा केंद्रबिंदू मानला जातो. मग ते नियोजन कोणतेही असो. रिटायरमेंटनंतर कसं आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी किती निधीची आवश्यकता लागू शकते. याचे योग्य आर्थिक नियोजन असेल तर तुमचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य सुलभ होऊ शकते. आर्थिक नियोजन करण्यासाठी तुम्ही सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन तुमचे प्लॅनिंग करू शकता.
उत्पन्नापेक्षा खर्च वाढवू नका
आर्थिक स्थैर्य, हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खूप गरजेचं असतं. रिटायरमेंटनंतर जेव्हा आपले नियमित आर्थिक स्त्रोत बंद होतात. तेव्हा प्रत्येक खर्च जपून आणि विचार करून केला पाहिजे. कारण नोकरी करत असताना जमा केलेला पैसा हा जरी उतारवयासाठी असला तरी त्याचा खर्च वारेमाप करून चालणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जेवढे उत्पन्न मिळवता. त्याच्यापेक्षा जास्त खर्च होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. उत्पन्नातील ठराविक रकमेची नियमित बचत झाली तरच तुमचे नियोजन अर्थपूर्ण ठरू शकते.
अशाप्रकारे काही मूलभूत गोष्टींचे पालन केल्याने तुमचे उशिरा का होऊना पण निवृत्तीसाठी बचत होऊ शकते. रिटायरमेंटसाठी पैसे जमा करताना फक्त बचत गरजेची नसते. बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे ही तितकेच महत्त्वाचे असते. त्यातून भविष्यात चांगला परतावा मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर वायफळ खर्च कमी करणे, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च न करणे, महत्त्वाच्या कारणांसाठीच कर्ज घेण आणि त्यातून लवकर मुक्त होणे. अशाप्रकारच्या उपाययोजनांमधून तुम्ही नक्कीच निवृत्तीसाठी चांगला निधी उभा करू शकता.