Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Health Day: आरोग्य विम्याबाबत वारंवार विचारले जाणारे 'हे' 5 प्रश्न तुम्हाला ठाऊक आहेत का?

Health Insurance

World Health Day 2023: आर्थिक गुंतवणुकीचा श्री गणेशा करताना 'आरोग्य विम्यापासून (Health Insurance) सुरुवात करावी असे सांगितले जाते. या विम्या अंतर्गत तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर होतो. मात्र प्रत्यक्षात विमा/इन्शुरन्स खरेदी करताना लोकांचा पुरता गोंधळ उडतो. तो कसा टाळावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

World Health Day 2023: सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे आरोग्य विमा योजना (Health Insurance Plan) उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी आपल्या प्लॅनमध्ये वेगवेगळ्या सुविधा देत असते. ऑनलाईन आणि ऑफलाईन (Online & Offline) अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही आरोग्य विमा खरेदी करू शकता. सर्वसामान्य लोक ज्यावेळी आरोग्य विमा खरेदी करतात. त्यावेळी त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्न असतात. आज ‘जागतिक आरोग्य दिना'च्या (World Health Day) निमित्ताने आरोग्य विम्यावर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत जाणून घेणार आहेत.

आरोग्य विमा का घ्यावा?

आजारपण हे कधीच सांगून येत नाही. अचानक उद्भवलेल्या आजारपणात नेमके किती पैसे खर्च होतात. हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणूनच ‘आरोग्य विमा’ (Health Insurance) घेण्याचा सल्ला अनेकजण देतात. आपल्याकडे आरोग्य विमा असेल, तर आपला वैद्यकीय खर्च त्यातून कव्हर करण्यात येतो. आर्थिक नियोजन करताना त्यामध्ये आरोग्य विम्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्लॅन उपलब्ध आहेत. कमीत कमी किमतीमध्ये या सुविधा पुरवल्या जात आहेत.

आरोग्य विम्यात काय-काय असते?

आरोग्य विम्यामध्ये मिळणारे फायदे हे पूर्णपणे तुम्ही खरेदी केलेल्या पॉलिसीवर आधारित असतात. सामान्यतः यामध्ये वैद्यकीय खर्चाचा समावेश करण्यात आलेला असतो. रुग्णाचा हॉस्पिटलायझेशनच्या पूर्वी आणि नंतर होणारा खर्च यामध्ये समाविष्ट असतो. सोबतच हॉस्पिटलचे रूम भाडे, अॅम्ब्युलन्स, मेडिकलमधील औषधे, वैद्यकीय चाचण्या इ. खर्चही समाविष्ट करण्यात आलेला असतो.  

हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्श्युरन्समध्ये फरक काय?

आरोग्य विमा आणि लाईफ इन्श्युरन्स (Life Insurance) हा एक नसून वेगवेगळा आहे. लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या कुटुंबाला तुमच्या अकाली मृत्यू किंवा तुम्हाला काही झाले, तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून सुरक्षा पुरवतो. इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळीच त्याचे पैसे मिळतात. 

याउलट आरोग्य विमा तुमचा वैद्यकीय खर्च कव्हर करतो आणि तुम्हाला सुरक्षा पुरवतो. तुम्ही घेतलेल्या पॉलिसी प्लॅनवर यातील सुविधा निश्चित करण्यात आलेल्या असतात. आरोग्य विमा तुम्हाला वार्षिक आधारावर रिन्यू करावा लागतो.

इन्शुरन्सवर कर सवलत मिळते का?

आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर तुम्हाला कर सवलत मिळवता येते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D अंतर्गत तुम्ही ही कर सवलत मिळवू शकता. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमिअमवर टॅक्स सवलत मिळवू शकते.  

इन्शुरन्स ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करावा?

आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. ऑफलाईन विमा खरेदी करताना एजंटची मदत घेता येते किंवा विना एजंटसुद्धा पॉलिसी घेता येते. पण त्याबाबतची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे. ऑनलाईन आरोग्य विमा खरेदी करताना तुम्ही वेगवेगळे प्लॅन एकाच वेळी तुलना करू शकता. ज्यामधून तुम्हाला बेस्ट प्लॅन निवडण्यासाठी मदत होऊ शकते. बऱ्याच वेळा ऑनलाईन माध्यमातून कमी किमतीत आरोग्य विमा खरेदी करता येतो. ऑफलाईन विमा खरेदी करताना एजंटला काही चार्जेस द्यावे लागू शकतात.