• 02 Oct, 2022 10:02

Women's Equality Day : गोष्टी समानतेच्या, मग वेतनातील असमानता कधी नष्ट होणार?

Gender Gap

Women's Equality Day 2022 : दोन महिन्यापूर्वी गुगलमधील काही स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळण्याविरोधात आवाज उठवून वेतनातील असमानता मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अखेर यश मिळाले. पण भारतातील खासगी क्षेत्रामध्ये आजही स्त्रियांना समान वेतनासाठी वेगवेगळ्या पातळीवर झगडावे लागत आहे.

Women's Equality Day 2022 : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2022 च्या मते एकाच प्रकारच्या जॉबसाठी स्त्रियांना पुरूषांपेक्षा 21 टक्क्यांनी कमी Salary दिली जाते. स्पेसिफिक भारताचा विचार केला तर 2019 मध्ये मॉन्स्टर संस्थेने (Monster Salary Index Report) केलेल्या सर्वेक्षणामध्ये हा फरक 19 टक्के इतका आढळून आला होता. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2022 मध्ये 146 देशांचा समावेश करण्यात आला आहे आणि यात भारत 135 व्या क्रमांकावर आहे. अर्थात भारतातही एकाच प्रकारच्या कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी पैसे दिले जातात. याला इथली संस्कृती किंवा परंपरा कारणीभूत असल्याची टीका काही जण करतात. पण ते पूर्ण सत्य नाही. भारतात खासगी क्षेत्रामध्ये आणि विशेषत: कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मुलांच्या बरोबरीने काम करूनही मुलींना कमी वेतन दिले जाते. आयटी फिल्डमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणांमध्ये आढळून आले.

स्त्रियांना कमी वेतन देण्याची मानसिकता प्रगत देशांमध्येही दिसून येते. महिला कितीही शिकल्या, त्यांनी कितीही मेहनत केली तरी, त्यांच्यावर जेंडर शिक्का मारून त्यांचं मोठेपण कमी केलं जातं. याला जगातील सर्वांत मोठी गुगल कंपनी सुद्धा अपवाद ठरली नाही. तिथेही स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने वेतन मिळण्यासाठी झगडावे लागले होते. 


महिला समानता दिवस का साजरा केला जातो?

महिला समानता दिवसाची सुरूवात अमेरिकेपासून झाली. तिथे महिलांना संपत्तीचा आणि मतदानाचा समान अधिकार मिळवण्यासाठी समाजाविरोधात लढा उभा करावा. या लढ्याचे यश म्हणून अमेरिका सरकारने 26 ऑगस्ट, 1920 मध्ये महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बहाल केला गेला. म्हणून जगभरात 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिवस (Women’s Equality Day) म्हणून साजरा केला जातो.

Salary Gender Gap

असमान वेतन! 

आज आपण कितीही स्त्री-पुरूष समानतेचे गुणगाण गात असलो तरी अजूनही समाजाच्या तळागाळात स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही. आपण अनेकदा पाहतो की, एकाच प्रकारचे काम करणाऱ्या पुरुषांचा पगार हा महिलांच्या पगारापेक्षा अधिक असतो. त्यांची क्षमता, आवश्यक शिक्षण असूनही त्यांना कमी लेखलं जातं. पगार कमी दिला जातो. याचा प्रतिबिंब समाजात आणि कुटुंबात उमटू लागतं. हे रोखण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायलाच हवं. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या की, आपोआप समानता येईल. यासाठी स्त्री आणि पुरूषांच्या वेतनात समानता आणणं गरजेचं आहे.

पगारातली असमानता ही थेट आर्थिक सुरक्षेवर परिणाम करत असते. यामुळे नकळत स्त्री असो वा पुरूष त्याच्यामध्ये तो डॉमिनंटपणा येतो. म्हणून पगारातली समानता खूप महत्त्वाची आहे. यासाठी समाजासोबत महिलांनाही या अशाप्रकारच्या मानसिकतेतून बाहेर पडणं गरजेचं आहे.