Term Insurance for Women: स्त्रियांच्या पैशांशी असलेल्या संबंधांबद्दल बऱ्याचदा काही नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात. महिला बहुतांश प्रमाणात आर्थिक नियोजनासाठी कुटुंबातील सदस्यांवर विशेषतः पतीवर अवलंबून असतात, हा त्यापैकीच एक समज. पॉलिसी बझारच्या अलीकडील एका डेटा विश्लेषणानुसार मात्र, स्त्रिया आता मोठ्या प्रमाणात स्वत:हून टर्म इन्शुरन्सची निवड करत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर उत्पन्नाचा कोणताही निश्चित स्रोत नसलेल्या गृहिणींमध्ये देखील सध्या टर्म इन्शुरन्स लोकप्रिय होत आहे.
निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, 45% गृहिणी स्वतःसाठी मुदतीचा विमा खरेदी करताना त्यांच्या पतींसोबत या निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत. आतापर्यंत गृहिणीची कुटुंबातील भूमिका काय हे विमा कंपन्यांनी स्पष्ट केलेले नसल्यामुळे महिलांना अशाप्रकारचा मुदतीचा विमा काढण्यात अडचण येत होती. मात्र, गृहिणीचे घरामधील महत्त्वाचे योगदान लक्षात घेऊन कंपन्यांनी गृहिणींसाठी स्टँड अलोन टर्म इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक महिलांनी टर्म प्लॅन विकत घेतल्याचे दिसून येत आहे.
पगारदार महिलाही आघाडीवर
केवळ गृहिणीच नाही तर पगारदार महिलाही आर्थिक नियोजनाशी संबंधित स्वतःचे निर्णय घेत आहेत. आकडेवारीनुसार, 81% पगारदार आणि 66% स्वयंरोजगार महिला मुदत जीवन विमा खरेदी करताना कुटुंबाबरोबर एकत्रितपणे निर्णय घेतात. औपचारिक शिक्षण घेतलेल्या मात्र स्त्रिया स्वतंत्रपणे खरेदीचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते.
मुलांचे भविष्य तर पालकांची काळजी
विवाहित महिलांमध्ये टर्म इन्शुरन्स खरेदीचे मुख्य कारण म्हणजे मुलांचे भविष्य सुरक्षित करणे हे आहे. त्याचबरोबर मुदतीच्या विमा पॉलिसीची लोकप्रियता मुले नसलेल्या विवाहित महिला आणि अविवाहित महिलांमध्येही जास्त आहे. केवळ विवाहितच नाही तर काही अविवाहित महिलादेखील त्यांच्या भविष्यात होऊ घालणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी टर्म इन्शुरंस घेत आहेत. यामध्ये बहुतांश महिलांनी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी मुदत विमा खरेदी केला आहे.