"आज माणसाचा घडीचाही भरवसा राहिला नाही" असं वाक्य कुठेही चर्चा सुरू असताना सहज तुमच्या कानावर पडलं असेल. बदलती जीवनशैली, कामाचा व्याप, अपघात, अनिश्चता आणि इतरही असंख्य कारणांमुळे कोणती आणीबाणी कधी येईल सांगता येत नाही. एखाद्याचा मृत्यू होणं ही त्याच्या कुटुंबावर आलेली सर्वात मोठी आणीबाणी. ही वेळ कोणावरही आणि कधीही येऊ शकते. अशा आणीबाणीचा सामना करण्यासाठी टर्म इन्श्युरन्स म्हणजेच जीवन विमा गरजेचा आहे. पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात नॉमिनीला एक ठराविक रक्कम मिळते. कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही याचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांवरही कुटुंबाची जबाबदारी पडत असते त्यामुळे दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे झाले आहे.
कमी वय असताना टर्म इन्शुरन्स का घ्यावा?
साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. वाढत्या वयानुसार पॉलिसी प्रिमियमही वाढत जातो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि नुकताच जॉब सुरू केला आहे. तुम्ही 50 लाखाचा कव्हर असणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत आहात. यासाठी तुम्हाला 900 रुपये दरमहा प्रिमियम भरावा लागेल. मात्र, तुम्ही पॉलिसी घेण्यास टाळाटाळ केली आणि हीच पॉलिसी तीसाव्या वर्षी घेण्याचे ठरवले तर तुम्हाला प्रिमियम कदाचित 1500 रुपये भरावा लागू शकतो. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही पॉलिसी काढाल तेवढे तुमचे पैसे वाचतील.
टर्म पॉलिसीमध्ये एकदा प्रिमियमची रक्कम निश्चित झाली की पूर्ण पॉलिसी काळापर्यंत तेवढीच राहते. प्रिमियम भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रिमियम भरण्याचा पर्याय निवडला असेल आणि तुम्हाला 900 रुपये द्यावे लागत असतील तर पूर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत तुम्हाला तेवढेच पैसे दरमहा भरावे लागतील.
कौटुंबिक जबाबदारी आणि आर्थिक नियोजन
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करायला लागल्यानंतर पुढच्या काही वर्षांतच तरुण/तरुणींवर कौटुंबिक जबाबदारी पडते. लग्न झाल्यानंतर पत्नी, मूल आणि सोबतच वयोवृद्ध होत चाललेले आई-वडील या सर्वांची जबाबदारी कमावत्या व्यक्तीवर पडते. अशा वेळी जर घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळू शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा ओळखून आधीच योग्य असा टर्म इन्शुरन्स खरेदी केला असेल तर या क्लेमच्या रकमेतून तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत सापडण्यापासून वाचवू शकता. जबाबदारी आल्यानंतर वाढत्या खर्चामुळे पॉलिसी घेण्यासही टाळाटाळ होते. त्यामुळे पैसे कमवायला लागल्यानंतर लगेचच जीवन विमा काढणे योग्य ठरू शकते.
वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधी
तुम्ही सर्वसाधारण 18 वर्षानंतर जीवन विमा खरेदी करू शकता. या काळात तुम्ही सर्वाधिक तंदुरुस्त असता. मात्र, वाढते वय, कामाचा व्याप आणि जीवनशैलीचे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जीवन विमा खरेदी करताना इन्शुरन्स कंपनी वैद्यकीय चाचणी घेते. तुम्हाला काही गंभीर आजार तर नाही ना? तसेच तुमचा फिटनेस कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. यावर तुम्हाला पॉलिसी मिळेल की नाही, किंवा प्रिमियम किती असेल हे ठरते. जर तुम्ही कमी वयामध्ये पॉलिसी घेत असाल तर तुमच्या सर्व चाचण्या सर्वसाधारण असण्याची शक्यता अधिक असते. मात्र, तिशी किंवा पस्तीशीमध्ये जर तुम्ही पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर वैद्यकीय चाचणीमध्ये एखाद्या व्याधीची सुरुवात झाल्याचे चाचणीत दिसू शकते. त्यामुळे तुम्हाला कदाचित प्रिमियम जास्त भरावा लागू शकतो. त्यामुळे कमी वय असताना टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढणे कधीही योग्य.