गेल्या दोन वर्षांत भारतात डिमॅट खातेधारकांची (DEMAT Account) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ऑगस्ट, 2022 अखेरपर्यंत देशात एकूण 10 कोटींहून अधिक डीमॅट अकाऊंटची संख्या झाली आहे. गुंतवणूकदार ऑनलाईन गुंतवणुकीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचं हे निदर्शक मानलं जातं.
लॉकडाऊनचा कालावधी आणि त्यात वर्कफ्रॉम होममुळे (Work from Home) लोकांना घरबसल्या अधिक वेळ मिळू लागला होता. या वेळेचा सदुउपयोग करत अनेकांनी शेअर मार्केट (Share Market)मध्ये ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली. परिणामी डिमॅट अकाऊंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. भारतात NSDL आणि CDSL अशा दोन डिमॅट सेवा (DEMAT Service) पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांना नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपन्टस (Depository Participant) या नावाने ओळखले जाते. शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्डस, गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज अशी अनेक प्रकारची गुंतवणुकीची सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये साठवून ठेवण्याचे काम दोन्ही डीपी करतात.
ग्राहक गुंतवणुकीसाठी आपल्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांच्यापैकी कोणाकडेही डिमॅट खाते उघडू शकतात. अनेक ब्रोकर दोन्ही कंपन्यांत डिमॅट खाती उघडण्याचा पर्याय देतात. त्याचप्रमाणे गुंतवणुकदारांनीही वेगवेगळ्या कारणाने एकापेक्षा जास्त डिमॅट अकाऊंट उघडली आहेत. सीडीएसएलने (CDSL) आपल्याकडे सात कोटींहून अधिक सक्रीय डिमॅट अकाऊंट असल्याचे ऑगस्ट 2022 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले होते.
Source : www.tradebrains.in/
बॅंकांच्या मुदत ठेवीचा (Fixed Deposit-FD) रोडावत जाणारा व्याजदरदेखील डिमॅट अकाऊंटच्या वाढीला पोषक ठरला. एफडीचे रेट (Fixed Deposit Rate) आता वर्षभराच्या मुदतीसाठी साधारण 5 ते 6 टक्के स्थिरावल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या मुद्दलीसाठी आणि काळासाठी त्यात फरक पडतो. त्यातच 2022 च्या मध्यानंतर अनेक बॅंकांनी एफडीचे दर काही प्रमाणात वाढवल्याचे चित्र आहे. तरीही ते दर महागाईच्या (Inflation) दरापेक्षा कमी असल्याने एफडीऐवजी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देऊ लागले. अशा स्थितीत म्युच्युअल फंडचे युनिट साठवण्यासठी डीमॅट अकाऊंटचा वापर होऊ लागला. अनेक बॅंकाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देत आहेत. परिणामी डिमॅट अकाऊंट उघडण्याच्या संख्येवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते.
या महत्त्वाच्या घटकांसोबतच खाते उघडणे अधिक सहजसोपे झाले. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने आणि दलालीचे (ब्रोकरेज) दर कमी असल्याने डिमॅट खाती उघडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. महानगरांपाठोपाठ आता द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधून (2 & 3 tier city) गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. डीपीं (डिपॉझिटरी पार्टिसिपन्टस)सह अनेक वित्तीय संस्था (Financial Institutions) या शहरांमधून गुंतवणुकीच्या नव्या साधनांबद्दल जनजागृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यामुळे देशात एकूणच गुंतवणुकीच्या या मार्गांमध्ये लोकांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा ओढा वाढला. परिणामी अशा व्यवहारांसाठीच्या डिमॅट खात्यांची संख्याही वाढली.